कोल्हापूरमधील हे पहिले कारागृह: बिंदू चौक सबजेल; उंच दगडी भिंतीआडचं जग!

 heritage of kolhapur story by uday gaikwad
heritage of kolhapur story by uday gaikwad

कोल्हापूर : बिंदू चौकातील कमानीला लागून सबजेलची इमारत आहे. इमारत म्हणजे उंच दगडी भिंती आणि मोठा भक्कम लोखंडी दरवाजा... त्याला छोटा झरोका असलेला दिंडी दरवाजा एवढंच बाहेरून दिसतं. आतल्या बाजूला काय- काय व्यवहार सुरू असतील, याची फक्त कल्पनाच आपण करतो. याला वारसास्थळ का म्हणावं, असा प्रश्न पडतोच. या वास्तूला अनेक आयाम आहेत ते समजून घेतले तर त्या वारसास्थळाचे महत्त्व कळते. तुरुंग ही कल्पनाच माणसाला गुन्हा करण्यापासून परावृत्त करण्याचे कारण ठरते. तुरुंगात काय असते, हे ऐकून किंवा चित्रपटातील दृश्‍यांनी समजलेलं असतं. इथली बांधकाम आणि सुरक्षेची रचना वेगळी आहे.
 

कोल्हापूरमधील हे पहिले कारागृह १८४७-४८ मध्ये बांधले गेले. त्याआधी गुन्हेगारांना किल्ल्यांत कोंडून ठेवत. विसापूर, रायगड, लिगांना, पन्हाळा किल्ल्यांवर अशी व्यवस्था होती. कोल्हापूरमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागात रंकभैरवाच्या मंदिराजवळ अंधार कोठडी होती. तिथे गुन्हेगाराला ठेवत.


तटबंदीला लागून रविवार वेशीच्या कमानी जवळ बारा हजार रुपये खर्च करून बांधलेल्या कारागृहाचा विस्तार १८७३ मध्ये पुन्हा बारा हजार रुपये खर्च करून करण्यात आला. त्यामध्ये मुख्य इमारतीच्या उत्तरेस दुमजली इमारत बांधण्यात आली. शंभर वर्षे झाल्यावर अपुऱ्या पडणाऱ्या कारागृहाची नवी इमारत कळंबा परिसरात बांधण्यात आली. तुरुंगात हातापायात साखळ दंड घातलेले म्हणजे खोड्याची शिक्षा असलेल्या कैद्यांना वेगळी कोठडी होती. तुरुंगात फाशी देण्याची रचना होती. अलीकडे हे फाशिगेट बंद केले आहे.


रविवार वेशीचा आज असलेला दरवाजा पूर्वेकडे उघडणारा आहे. त्याला लागूनच उत्तरेकडे तोंड असलेला एक दरवाजा भिंत बांधून बंद केलेला दिसतो. त्यातून आत आल्यावर पुन्हा उत्तरेकडे तोंड असलेल्या दरवाजाची चौकट व अवशेष दिसतात. मात्र, हा मार्ग बंद केलेला दिसतो. तुरुंग बांधण्याआधी हा मार्ग वापरात असावा.
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर तुरुंग अधिकारी कक्ष व कर्मचाऱ्यांना असणारे कक्ष वगळता इतर भाग दवाखाना, ग्रंथालय, चौकशी कक्ष अशी रचना आहे. मध्यभागी मोकळा आवार असून, अशोकाची मोठी झाडे आहेत.


त्यापुढे उंच भिंत आणि त्याच्या एका बाजूला मोठा दरवाजा आणि त्याला अगदी छोटा दिंडी दरवाजा असलेले लाल गेट आहे. लालगेटमधून आत गेल्यावर केशकरतन करायला जागा आहे. 
चारही बाजूंना १०४ पुरुष कैद्यांसाठी पाच बऱ्याक व तीन रूम आहेत. त्यावरील भागात तीनही बाजूंनी पहारा ठेवण्यासाठी सज्जा असून, तिथे गस्त सुरू असते. मध्यभागी स्वयंपाक घर व सभागृह असून, त्यामध्ये व्याख्यान, योगा, प्रवचन होते. प्रत्येक बऱ्याकमध्ये टीव्हीची सुविधा असून, ग्रंथालय, कॅरम, हॉलीबॉल, बुद्धिबळ अशा खेळांची सुविधा आहे. त्यालगत एकवीस महिलांसाठी स्वतंत्र रचना असून, दोन बऱ्याक व एक खोली आहे.


कच्चे कैदी आणि अल्प काळ शिक्षा भोगण्यासाठी ठेवलेल्या कैद्यासाठीच हे कारागृह आहे. बदललेल्या करागृहाच्या नियमाप्रमाणे येथे सुविधेसाठी काही बदल झाले. इथल्या शिस्तीचा भाग म्हणून वास्तुची देखभाल होते. वारसा म्हणून त्याचे संरक्षण, संवर्धनाची जबाबदारी शासनानेच पार पाडली पाहिजे.

तुरबत कायम ठेवून बांधल्या इमारती
कारागृह बांधण्यापूर्वी इथे एक तुरबत होती. ती कायम ठेवून इमारती बांधल्या. इथे मोहरमला शहरातील इतर पंजे भेट देण्यासाठी येत असत. १९४८ पासून मात्र ही प्रथा बंद झाली. आतील आवारात मारुतीचे मंदिर तटाच्या भिंतीत थोडे खोलात आहे. मारुतीची ही मूर्ती शिवलिंगावर उभी आहे. त्याबरोबर गणपती, वैष्णवी व विष्णूची उभी मूर्ती नागाच्या पार्श्वभूमीवर आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com