महाराष्ट्राचे कुस्ती क्षेत्र गहिवरले : मातीतील कुस्तीचा हुकमी एक्का गमावला

hind kesari wrestler khanchnale memories story by suyog ghatge
hind kesari wrestler khanchnale memories story by suyog ghatge

कोल्हापूर : हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या रूपाने कुस्ती क्षेत्रातील सूर्य, तेजस्वी तारा, लढवय्या मल्ल व मातीवरचा हुकमी एक्का कोल्हापूरकरांनी काल गमावला. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्राची हानी झाली असून, ही पोकळी भरून काढता येणार नाही, अशा शब्दांत कुस्ती क्षेत्रातील दिग्गजांनी आज प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान, खंचनाळे यांच्या निधनानिमित्त मंगळवार (ता. १५) दिल्लीतील छत्रसाल आखाडा बंद ठेवून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याचे अर्जुनवीर सतपाल यांनी सांगितले. 

 खंचनाळे हरहुन्नरी पैलवान होते. ते आव्हान देणारे व स्वीकारणारे होते. मातीवरचा हुकमी एक्का, अशी त्यांची ख्याती होती. नामवंत पैलवानांविरुद्ध त्यांच्या लढती झाल्या. त्यात त्यांनी कधी जय-पराजयाला महत्त्व दिले नाही. कुस्ती जिवंत राहिली पाहिजे, हा त्यांचा अट्टहास होता. 
- राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग 

 कुस्तीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असून,  कौशल्याच्या जोरावर पहिले हिंदकेसरी होण्याचा बहुमान मिळवला. त्यांच्यापासून अनेक मल्लांना प्रेरणा मिळाली. कुस्ती खेळणे थांबवल्यानंतरदेखील शाहूपुरी तालमीत अनेक पैलवान घडविण्याचे काम त्यांनी केले. 
- ॲड. महादेवराव आडगुळे

 त्यांचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी झाले. त्यामुळेच आम्ही घडलो. कुस्ती क्षेत्रातील ते जाणकार होते. कुस्तीविषयीची त्यांची ओढ त्यांच्या चालण्या-बोलण्यातून व्यक्त व्हायची. मैत्रीला जागणारा म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने उत्कृष्ट मार्गदर्शक कोल्हापूरने गमावला आहे. 
- महाराष्ट्रकेसरी विष्णू जोशीलकर

 देश एका मोठ्या पैलवानाला आज मुकला. त्यांनी देशाचे नाव मोठे केले. खेडेगावातील एक तरुण कुस्तीत कसा चमकू शकतो, याचा आदर्श त्यांनी घालून दिला. आशियाई स्पर्धेत ते सुवर्णपदक विजेते होते. त्यांच्या कुस्तीतील प्रवास लक्षात घेत नव्या दमाच्या पैलवानांनी मेहनत घ्यायला हवी. देशासाठी पदके मिळवायला हवीत. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- अर्जुनवीर कर्तारसिंग 

 श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाने भारताच्या कुस्ती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. ते कुस्ती क्षेत्रात देशाची प्रेरणा होते. संपूर्ण आयुष्य त्यांनी कुस्तीसाठी व्यतीत केले. ज्यावेळी मी लढतीसाठी महाराष्ट्रात येत होतो. त्यावेळी ते मला प्रोत्साहित करायचे. त्यांचा आशीर्वाद आमच्यासाठी महत्त्वाचा होता. आम्ही ज्यावेळी भेटत होतो, त्यावेळी ऑलिंपिक स्पर्धेत देशातील पैलवानांनी पदक मिळवावे, या विषयावर चांगली चर्चा व्हायची. त्यांच्या निधनानिमित्त उद्या दिल्लीतील छत्रसाल आखाडा बंद राहील. शोकसभा घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत.
- अर्जुनवीर सतपाल 

 कुस्तीतील महान सूर्याचा अस्त झाला. हिंदकेसरी मारुती माने, गणपतराव आंदळकर, श्रीपती खंचनाळे आमची तिन्ही दैवतं होती. किती काही आज आमच्यात नाहीत, याचे दुःख मोठे आहे. नव्या पिढीसाठी हे तिघेही प्रेरणास्थान बनून राहतील. खंचनाळे यांनी प्रतिकूल परिस्थितीतून कुस्ती क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. त्यांची सातत्याने आठवण येत राहील. 
- हिंदकेसरी दीनानाथ सिंह

 खंचनाळे यांनी नेहमीच लढाऊ बाणा जपला. कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही. अखेरपर्यंत लढत राहायचे, हीच त्यांची वृत्ती होती. याचा प्रत्यय त्यांच्या कारकिर्दीतील अनेक कुस्त्याकडे पाहिले असता येतो.
- वस्ताद बाळ गायकवाड 

 कुस्तीतला तारा आज निखळला असून, त्यांची उणीव भरून निघणार नाही. कोल्हापुरात लढतीसाठी आल्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेत होतो. त्यांचे कुस्तीवर जबरदस्त प्रेम होते. कुस्तीत त्यांचे मोठे योगदान राहिले. 
- हिंदकेसरी रोहित पटेल

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com