संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात असलेली कमान अशी राहीली उभी

historical chatrpati shiwaji market information by sambhaji gandmale
historical chatrpati shiwaji market information by sambhaji gandmale

कोल्हापूर : सध्याचे छत्रपती शिवाजी मार्केट म्हणजे पूर्वीचे फेरीस मार्केट. संस्थानकाळात ब्रिटिश प्रशासक कर्नल डब्ल्यू. बी. फेरीस यांनी शहराच्या नियोजनबद्ध विकासाला प्राधान्य दिले. त्यांच्याच काळात या मार्केटची उभारणी झाली आणि तत्कालीन सर्वाधिकारी (कै.) भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात फेरीस यांचेच नाव या मार्केटला दिले गेले. 

शहरात आठवडा बाजार वेगवेगळ्या ठिकाणी भरत असल्याने व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांनाही त्याचा त्रास व्हायचा. त्याशिवाय स्वच्छतेचाही प्रश्‍न होताच. त्यामुळे मग फेरीस यांनी एकत्रित आठवडा बाजाराची आखणी केली आणि शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी देखणी वास्तू उभारली गेली. या ठिकाणी भाजीपाल्यापासून किराणा मालापर्यंत सर्व खरेदी एकाच ठिकाणी करता येत असल्याने ग्राहकांचाही वेळ आणि पैसा वाचू लागला आणि व्यापाऱ्यांचीही एकाच ठिकाणी सोय झाली. 

त्यानंतर प्रशासक द्वारकानाथ कपूर यांच्या काळात रस्ता रुंदीकरणातील मार्केटची जागा वगळून पुनर्बांधणीचा निर्णय झाला. पुढे पाचमजली इमारत उभी राहिली आणि मार्केटचे छत्रपती शिवाजी मार्केट असे नामकरणही झाले. सध्या मार्केटमध्ये २२० गाळे आहेत. महापालिकेच्या विविध विभागांची कार्यालये याच इमारतीत आहेत; पण मार्केटमधील भाजीपाला मार्केट गेली बारा ते तेरा वर्षे रिकामे आहे. सुमारे सहा हजार चौरस फुटांची जागा पडून आहे. त्यामुळे या जागेचा दुरुपयोग वाढला आहे. 

मूळ उद्देश बाजूलाच...
मुळात इमारतीत भाजी मार्केट असल्याने या ठिकाणी भाजी नेण्यासाठी आल्यानंतर सर्व प्रकारची खरेदी करण्यावर भर दिला जायचा; पण भाजी मार्केटच बंद असल्याने इमारतीतील गाळेधारकांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. प्रत्येक आयुक्तांकडे गाळेधारक संघटना पाठपुरावा करते; पण अद्यापही भाजी मार्केट सुरू झालेले नाही. त्याशिवाय इमारतीच्या देखभालीच्या प्रश्‍नाबरोबरच अस्वच्छतेचे साम्राज्य नेहमीचेच झाले आहे. महापालिकेच्या गाळेधारकांना अन्यायी भाडेवाढ झाल्यानंतर याच मार्केटमध्ये शहरातील गाळेधारकांच्या संघटनेचा जन्म झाला आणि त्यानंतर आजअखेर संघटनेमार्फत गाळेधारकांच्या विविध प्रश्‍नांसाठी पाठपुरावा सुरू आहे, असे बबन महाजन सांगतात.

‘केशवराव’मध्ये कमान...
फेरीस मार्केटची कमान १८७८ ते १८८२ या काळात उभारली गेली. पुढे रस्ता रुंदीकरणावेळी अडथळा ठरत असल्यामुळे ती नंबरिंग करून उतरवण्यात आली आणि संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात तिची पुनर्स्थापना करण्यात आली. कमानीचा हा पुनर्स्थापना कार्यक्रम यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी सुभाष राणे महापौर, भीमसिंग रजपूत उपमहापौर तर ॲड. महादेवराव आडगुळे स्थायी समिती सभापती होते, असे हेरिटेज समितीचे उदय गायकवाड सांगतात.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com