पश्‍चिम घाटाची निर्मिती ज्वालामुखीच्या विवरातून तर जलजन्य खडक आढळतात 'या' भागात...

अमोल सावंत | Tuesday, 14 July 2020

आता पृथ्वीवर किंवा भारतात जे काही जीवाश्‍म जलजन्य खडकात सापडतात. ती सर्व जीवाश्‍मे 570 दशलक्ष वर्षानंतरची आहेत.

कोल्हापूर - ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर पडतानाचे तापमान 700 ते 1500 डिग्री सेल्यिस झाल्यामुळे 570 दशलक्ष वर्षांनंतरचे जे काही जीवाश्‍म पश्‍चिम घाटात किंवा पश्‍चिम महाराष्ट्रातील खडकांमध्ये होते. ते पूर्णपणे नष्ट झाले. राख झाली. भुगा झाला. परिणामी, जीवाश्‍म उरले नाही. आता शोध घेतला तरी ते कुठे दिसतही नाही. दुसरे म्हणजे, पश्‍चिम घाटाची निर्मिती ही ज्वालामुखीच्या विवरातून झाली. अख्खे दख्खन पठार लाव्हारसाच्या निर्मितून तयार झाले. त्यामुळे जीवाश्‍माचे साधे अवशेषही दिसत नाहीत. असे जीवाश्‍म फक्त जलजन्य खडकातच सापडतात. अन्यत्र हे जीवाश्‍म सापडत नाहीत. खरेतर जीवाश्‍माच्या माध्यमातून पृथ्वीचा अन्‌ वातावरणाचा इतिहास सापडतो. इतिहासाचा हा ठेवा जिथे असेल तिथे तो जपला पाहिजे. दख्खन पठार अग्निजन्य खडकांचे असल्याने जीवाश्‍म मिळत नाही.

पुराजीवशास्त्रज्ञ म्हणतात, आता पृथ्वीवर किंवा भारतात जे काही जीवाश्‍म जलजन्य खडकात सापडतात. ती सर्व जीवाश्‍मे 570 दशलक्ष वर्षानंतरची आहेत. त्याआधीच्या कालखंडात सुक्ष्म जीव, एकपेशीय जीव पृथ्वीवर होते. 570 दशलक्ष वर्षानंतरच जीवांची निर्मिती होऊ लागली. जसे जीव मृत होत गेले. तसे त्यांचे अवशेष जलजन्य खडकात सापडू लागले. आपल्या परिसरात असे जलजन्य खडकांचे तुकडे सापडत नाहीत. याबाबत प्रा. डॉ. उल्हास भागवत म्हणाले, "जलजन्य खडक म्हणजे, लाईमस्टोन, सॅंडस्टोन, शेल, कोळसा. हा कोळसा काबर्नच्या संयुगांनी बनलेला असतो. नागपुरच्या पठारातून इथल्या शिरोली, गोकुळ शिरगाव येथील फौंड्रीत येणाऱ्या कोळशात असे जीवाश्‍म सापडतात. कोळशाच्या जीवाश्‍मात प्रामुख्याने गॅंगामॉप्टेरिस, ग्लासोप्टेरिस वनस्पतींचे जीवाश्‍म सापडते. या वनस्पती गोंडवन कालखंडात होत्या.''

वाचा - घरगुती नैसर्गिक एन्जाईम कसं बनवाल ? बगीचा व घरातल्या स्वच्छतेसाठी होतो वापर...

पश्‍चिम घाटात असे जलजन्य खडक नाहीत. असे खडक कर्नाटक, तामीळनाडू, केरळ आदी भागात आढळतात. या खडकात सॅंडस्टोन, लाईमस्टोन असतो. प्राणी, वनस्पती, पक्षी, सुक्ष्म जीव आदी घटक या खडकात भरपूर आढळतात. जलजन्य किंवा रुपांतरीत खडकात एक ते दोन टक्के जीवाश्‍म सापडतात. जीवाश्‍म म्हणजे, एखादा प्राणी मृत झाला की, तो वाहत एकेठिकाणी येतो. त्यावर वाळू, मऊ मातील असे घटक एकांवर एक पसरत जातात. नंतर हे घटक घट्ट होतात. त्याचा खडक तयार होतो. त्या खडकात हा मृत जीवाचा सांगाडा टिकतो. पूर्वीच्या काळात नेमके कोणते प्राणी अस्तित्वात होते? आता कोणते प्राणी, जीव शिल्लक आहेत, तेही समजते. महाराष्ट्रात कोकणात, नागपुर विभागात असे काही जलजन्य खडक उपलब्ध आहेत. तिथे जीवाश्‍म सापडते.

''राजाराम कॉलेजमध्ये जिऑलॉजी विषय शिकविला जातो. याअंतर्गत जिऑलॉजीच्या शाखांवर अभ्यास, संशोधक करता येते. आमच्याकडे काही जीवाश्‍म, खडकांचे नमुने अभ्यासासाठी ठेवले आहेत. जिऑलॉजी घेऊन स्पेशल संशोधन ही करता येते.''
- प्रा. डॉ. उल्हास भागवत

 

संपादन - मतीन शेख