लॉकडाऊनच्या काळात इचलकरंजीत प्राणीमात्रांवर भूतदया... 

संजय खूळ 
Friday, 3 April 2020

शहर आणि परिसरात लॉकडाऊनच्या काळात अनेक पक्षी आणि प्राण्यावर संकटे येत आहेत. निर्जन असलेल्या रस्त्यावर काहीवेळा असे प्राणी तळमळत असल्याचे चित्र अनेकवेळा दिसत आहे. त्याचबरोबर शेतात आणि झाडाच्या खाली पक्षीही जखमी अवस्थेत दिसून येत आहेत.

इचलकरंजी - कुत्र्याच्या हल्ल्यात मोर जखमी, माकडाचा जबडा फाटल्याने गंभीर, रस्त्यावरच व्यालेल्या गायीची वेदनेने व्याकुळता... अशा सर्व घटनेच्यावेळी लॉकडाऊनच्याही काळात प्राणी आणि पक्षांच्यावर येणार्‍या संकटाच्यावेळी येथील पक्षी व प्राणीमित्र असणारे कार्यकर्ते तात्काळ धावून जात आहेत. यातून अनेक पक्षी आणि प्राण्यांना पुर्नजन्म मिळाला आहे.

शहर आणि परिसरात लॉकडाऊनच्या काळात अनेक पक्षी आणि प्राण्यावर संकटे येत आहेत. निर्जन असलेल्या रस्त्यावर काहीवेळा असे प्राणी तळमळत असल्याचे चित्र अनेकवेळा दिसत आहे. त्याचबरोबर शेतात आणि झाडाच्या खाली पक्षीही जखमी अवस्थेत दिसून येत आहेत. अशांवर तातडीने इलाज होणे आवश्यक असतो. इचलकरंजी शहरातील अनेक पक्षी आणि प्राणीमित्र नेहमीच अशावेळी पुढे होऊन उपचार करतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात त्यांचे काय असा प्रश्‍न निर्माण होतो. इचलकरंजी येथील वाईल्ड लाईफ कंझरव्हेशन अ‍ॅण्ड रिसर्च फौंडेशन (डब्ल्यूसीआरएफ) या संस्थेचे दिग्वीजय कित्तूरे, अमित कुंभार यांच्यासह अनेकजण या लॉकडाऊनच्या काळातही मदतीसाठी धावून जात आहेत.

इचलकरंजीत पंचगंगा नदीकाठावर मगरीचे दर्शन ; वन विभागाचा सतर्कतेचा इशारा  

चंदूर येथील एका मोरावर कुत्र्यांनी हल्ला केला. ही बाब शेतकर्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी कुत्र्याला तात्काळ हटविले. पक्षीमित्रांना ही माहिती मिळताच श्री. कित्तूरे व कुंभार यांनी डॉ. स्वप्नील पाटील व डॉ. संतोष वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावर उपचार केले. शहरातील एमएसईबी कॉलनीत एक माकड गंभीर अवस्थेत बसून होते. याबाबतची माहिती वरील दोघांना मिळाली. जबाडा फाटलेला, अंगात प्रचंड ताप अशा स्थितीतील माकडाला ताब्यात घेऊन त्यावर योग्य उपचार केले व माकडाला सोडून दिले.

आज सकाळी पुन्हा गांधी पुतळा या ठिकाणी एक गाय व त्याचे पिल्लू बसून होते. दोन दिवसापूर्वी व्यायलेल्या या गाईच्या स्तनातून दुधच बाहेर आले नव्हते. यामुळे गाईचे पिल्लू भुकेने व्याकूळ होते. तर दुसर्‍या बाजूस दुध न आल्यामुळे स्तन प्रचंड सुजलेले होते. याबाबतची माहिती श्री. कित्तूरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ या गाईला पुढील उपचारासाठी स्थलांतरीत केले.
लॉकडाऊनच्या काळातही माणूसकीचा हा झरा अनेक पक्षी आणि प्राण्यांना जीवदान देणारे ठरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in ichalkaranji lockdown condition people help to animals