esakal | ‘तुझ्या बंदुकीत किती ताकद आहे पाहू’ म्हणत पोलिसांसमोर गेलेल्या  पैलवानावर झाडल्या गोळ्या
sakal

बोलून बातमी शोधा

Identification of the heirs of the martyrs in belgaum

संयुक्‍त महाराष्ट्रासाठी छातीवर झेलल्या गोळ्या

कंग्राळी खुर्दचे मारुती बेन्नाळकर; पत्नी लक्ष्मीबाईंकडून कष्ट उपसत संसार नेटाने

‘तुझ्या बंदुकीत किती ताकद आहे पाहू’ म्हणत पोलिसांसमोर गेलेल्या  पैलवानावर झाडल्या गोळ्या

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : ‘तुझ्या बंदुकीत किती ताकद आहे पाहू’, असे म्हणत एक निधड्या छातीचा पैलवान पोलिसांसमोर गेला. निर्दयी पोलिसांनी कशाचाही विचार न करता त्या पैलवानावर गोळ्या झाडल्या. संयुक्‍त महाराष्ट्रासाठी आपले रक्‍त सांडलेल्या या पैलवानाचे नाव मारुती बेन्नाळकर होय. त्यांच्या पत्नी व कुटुंबाला अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, तरीही हार न मानता संयुक्‍त महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगत हुतात्मा बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी संसार नेटाने केला.

भाषावार प्रांतरचनेवेळी सीमाभागावर अन्याय करण्यात आला. याविरोधात १७ जानेवारी १९५६ रोजी बेळगावात आंदोलन झाले. या संयुक्‍त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. कंग्राळी खुर्द येथील मारुती बेन्नाळकर यांनीही हौतात्म्य पत्करले. त्यावेळी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचे वय अवघे १६ वर्षे होते. तर मुलगी फक्‍त दोन महिन्यांची होती. त्यामुळे लक्ष्मीबाई यांना कष्ट सहन करावे लागले. अनेकांच्या शेतात काम करावे लागले. तरीही त्यांनी आपली मुलगी वृषाली यांना दहावीपर्यंतचे शिक्षण दिले. 

बेन्नाळकर यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र एकीकरण समितीने नेहमीच मदत केली. माजी आमदार कै. बळवंतराव सायनाक यांनी घर बांधण्यासाठी तर माजी आमदार कै. प्रभाकर पावशे व अर्जुनराव घोरपडे यांनी मुलीच्या लग्नासाठी पुढाकार घेतला. माजी आमदार कै. बी. आय. पाटील हे सातत्याने बेन्नाळकर कुटुंबाची विचारपूस करीत होते. सध्या लक्ष्मीबाई यांच्यासमवेत त्यांची मुलगी वृषाली किरण मेणसे राहतात.

स्वप्न अद्यापही अपुरेच
अवघ्या दोन महिन्याची असताना वडिलांचे छत्र हरपल्याने वृषाली यांना वडिलांचा चेहराही आठवत नाही. मात्र वडिलांनी ज्या संयुक्‍त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, ते संयुक्‍त महाराष्ट्राचे स्वप्न अद्यापही पूर्ण झाले नाही, याची खंत मात्र त्यांना आहे. सध्या लक्ष्मीबाईंचे वय ८७ असून त्यांचीही सीमाभाग महाराष्ट्रात जावा, अशीच इच्छा आहे.

संपादन- अर्चना बनगे