esakal | शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी करा 
sakal

बोलून बातमी शोधा

 Inauguration of Shiv Jayanti Festival in kolhapur

शिवजयंती उत्सवाचे यापुढे तुकडे न पाडता सर्वच तरुण मंडळांनी 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करावी, अशी अपेक्षा आज मावळा ग्रुपच्या व्यासपीठावरून व्यक्त झाली. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते.

शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी करा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शिवजयंती उत्सवाचे यापुढे तुकडे न पाडता सर्वच तरुण मंडळांनी 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करावी, अशी अपेक्षा आज मावळा ग्रुपच्या व्यासपीठावरून व्यक्त झाली. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते.

हे पण वाचा - ...म्हणून चढला भास्कर जाधवांचा पारा

मिरजकर तिकटी येथे मावळा ग्रुपच्या वतीने "शौर्यगाथा-अपरिचित मावळ्यांची' हे महानाट्य तसेच शिवजयंती उत्सवाचे आज सायंकाळी उद्‌घाटन झाले. आमदार चंद्रकांत जाधव यांनी शिवजयंती तुकडे न पाडता सर्वच तालीम मंडळांनी, पेठांनी 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन केले. मराठा क्रांती मोर्चानंतर स्थापन झालेल्या मावळा ग्रुपचे कार्य कौतुकास्पद असून महापुराच्या काळात मावळ्यांनी जे काम केले, ते अविस्मरणीय असल्याचे नमूद केले. 
शाहू महाराज यांनीही शिवजयंतीची 19 फेब्रुवारी ही तारीख अभ्यासानंतरच निश्‍चित केली आहे. शिवजयंती दररोज साजरी केली, तर हरकत नाही. तसे कामच छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांसमोर उभे केले आहे. शिवजयंती एकाच दिवशी साजरी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे. मावळा ग्रुपने महापुरात सामाजिक बांधिलकी जोपासली. मावळ्यांनी काम यापुढेही सुरू ठेवावे. 

या वेळी नामदेव यादव यांना मावळा गौरव पुरस्काराने सन्मानित केले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, जयेश कदम, निवास साळोखे, अश्‍विनकुमार वागळे, अजय शिंदे, आर. डी. पाटील आदी उपस्थित होते. 

महानाट्यासाठी परिश्रम घेणारे विनोद साळोखे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार झाला. ग्रुपचे अध्यक्ष उमेश पोवार, मनोज कोकाटे, सूरज आमटे, मयूर पाटील, राजेंद्र नलवडे, युवराज पाटील, राहुल भोई आदी उपस्थित होते. 

अन्‌ अंगावर शहारे 
विनोद साळोखे लिखित "शौर्यगाथा-अपरिचित मावळ्यांची' हे महानाट्य कार्यक्रमानंतर सादर झाले. अंगावर शहारे आणणारे आणि शिवरायांचा ज्वलंत इतिहास उभे करणारे नाट्य पाहण्यासाठी मिरजकर तिकटी येथे गर्दी झाली.