इंचनाळला गणेश मंदिर उपसमिती करणार खत निर्मिती

अवधूत पाटील
Monday, 18 January 2021

इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील प्राचीन गणेश मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गणेश जयंती, संकष्टीला मंदिरात हजारो भाविकांची मोठी गर्दी असते.

गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील प्राचीन गणेश मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गणेश जयंती, संकष्टीला मंदिरात हजारो भाविकांची मोठी गर्दी असते. शिवाय दररोजही इंचनाळसह पंचक्रोशीतील भाविक हजेरी लावतात. भाविकांच्या वर्दळीमुळे नारळाच्या शेंडीसह कचरा मोठ्या प्रमाणात होतो. आता या कचऱ्याचे कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. देवस्थान स्थानिक सल्लागार समितीने त्याबाबत नियोजन केले आहे. 

प्राचीन गणेश मंदिर इंचनाळसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गणेश जयंतीला सुमारे 50 हजार भाविक हजेरी लावतात. तर अंगारकी संकष्टीला 10 ते 15 हजार भाविकांची उपस्थिती आहे. दर महिन्याला होणाऱ्या संकष्टीला दर्शन घेणाऱ्यांची संख्या पाच हजाराच्या घरात आहे. शिवाय दररोज गावातील आणि पंचक्रोशीतील भाविकही असतात. शासनाने दोन वर्षांपूर्वी इंचनाळच्या गणेश मंदिराचा "क' वर्ग पर्यटनस्थळात समावेश केला आहे. त्यातून आतापर्यंत 40 लाख रुपयांची कामे झाली आहेत. मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. 

कृषी विभागाचे सहकार्य 
भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा होतो. नारळाच्या शेंडीसह अन्य घटकांचा यामध्ये समावेश आहे. शिवाय मंदिर परिसरात झाडे आहेत. या झाडांचा पालाही गोळा होता. संकष्टीला साधारण एक ट्रॉली तर गणेश जयंतीला पाच ते सहा ट्रॉली कचरा गोळा होतो. दररोज जमा होणारा हा कचरा पेटवून दिला जातो. पण, आता या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. मंदिर परिसरातच त्याचे नियोजन केले आहे. गणेश मंदिर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीने त्याचे नियोजन केले आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या मार्गदर्शनातून आणि कृषी विभागाच्या सहकार्यातून हा उपक्रम आकाराला येत आहे. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inchanal Ganesh Mandir Sub-Committee Will Produce Fertilizer Kolhapur Marathi News