दिलासादायक ःकोरोनाबाधित चिमुकलीचे वाढवले मनोबल

दिलासादायक ःकोरोनाबाधित चिमुकलीचे वाढवले मनोबल

कोल्हापूर ः ती 12 वर्षांची चिमुरडी, शिरोळ तालुक्‍यातील औरवाड तिचे गाव. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसताना तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आणि कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच घसरली. तातडीने तिला कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले, तर तिच्या तीव्र संपर्कातील कुटुंबातील सर्वांनाच शिरोळमध्ये अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. आई-वडिलांपासून 50 किलोमीटर दूर पहिल्यांदाच आणि तेही रुग्णालयात राहिलेल्या आपल्या चिमुरडीची काय अवस्था असेल, या कल्पनेनेच कुटुंबाची घालमेल वाढली होती. अशा परिस्थितीत शिरोळच्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी रोज तिच्याशी संपर्क साधून तिला आधार दिलाच; पण तिचे मनोबल वाढवताना आई-वडिलांच्या अपरोक्ष मायेची ऊबही दिली. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलिसांप्रमाणेच महसूल विभागाचे कर्मचारीही दिवसरात्र राबत आहेत. तालुक्‍यात येणाऱ्यांची नोंद करणे, बाहेरून येणाऱ्यांच्या अलगीकरणाची व्यवस्था करणे, अशा अनेक कामांतून स्वतःच्या कुटुंबीयांकडेही वेळ द्यायला अधिकाऱ्यांना सवड मिळत नाही. अशा परिस्थितीत अधिकारीपदाचा डामडौल बाजूला ठेवून डॉ. मोरे यांच्यातील आईपण या निमित्ताने पाहायला मिळाले. या चिमुरडीला सीपीआरमध्ये ठेवल्यानंतर तिच्याशी संपर्क व्हावा म्हणून कुटुंबीयांनी तिला मोबाईलही दिला होता. कुटुंबातील कोणताही सदस्य किंवा ओळखीचा कुणीही जवळ नाही, अशा परिस्थितीत उपचार घेणाऱ्या या लहान लेकराला तिथे करमत असेल काय?, तिला त्रास होत असेल काय?, ती आईवडिलांची आठवण काढून रडत असेल काय?, तिच्यावर योग्य उपचार सुरू असतील काय?, ती या सगळ्या परिस्थितीला घाबरून गेली असेल काय? अशा प्रश्‍नांनी कुटुंबीय अस्वस्थ होते. त्यातून तिच्याशी संवाद साधत सर्वजण आधार देत होते. तिच्याशी कुटुंबीय संवाद साधत असताना समजले की आमच्याशिवायही एक जण तिला आधार देत आहे, आणि त्या तहसीलदार डॉ. मोरे आहेत. 
प्रशासनातील तालुक्‍याच्या प्रमुख म्हणून अनेक कामे करावी लागत असताना त्यातून वेळ काढून डॉ. मोरे रोज या मुलीशी बोलतात, तिला धीर देतात. स्वतःच्या मुलीसारखीच असलेल्या आणि कुटुंबापासून लांब असताना कोरोनाशी लढा देणाऱ्या मुलीशी बोलतात. एवढेच नव्हे तर स्वतःच्या मुलीलाही तिच्याशी बोलायला सांगतात. त्यातून एकमेकाला कधीही न पाहिलेल्या या दोन मुलीही चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. या निमित्ताने डॉ. मोरे यांनी पदाचा बडेजाव बाजूला ठेवून आणि माणुसकीचा एक आदर्श वस्तुपाठ समाजासमोर ठेवला आहे. 

कुटुंबाची माहितीही दिली 
मुलगीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कातील कुटुंबातील इतर सदस्यांचेही स्वॅब घेतले होते. गेल्या चार दिवसांपासून कुटुंबीय त्यांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत होते. काल रात्री या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे डॉ. मोरे यांनीच संबंधित मुलीच्या नातेवाइकांना फोन करून सांगितले आणि या कुटुंबीयाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता मुलगीही बरी होऊन लवकर घरी यावी, या प्रतीक्षेत हे कुटुंब आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com