शेतकरी सहलीची चौकशी करा, आजऱ्यात मागणी

रणजित कालेकर
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

आजरा तालुक्‍यात ठिक-ठिकाणी केबल खुदाई केल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत. केबलसाठी खोदलेल्या चरी व्यवस्थित बुजवावेत, अशी मागणी आजरा पंचायत समितीच्या सभेत करण्यात आली. कृषी विभागाकडून आयोजित केलेल्या शेतकरी सहलींची सभागृहाला माहिती मिळत नाही. या सहलीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग नसतो. त्यामुळे याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.

आजरा : तालुक्‍यात ठिक-ठिकाणी केबल खुदाई केल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत. केबलसाठी खोदलेल्या चरी व्यवस्थित बुजवावेत, अशी मागणी आजरा पंचायत समितीच्या सभेत करण्यात आली. कृषी विभागाकडून आयोजित केलेल्या शेतकरी सहलींची सभागृहाला माहिती मिळत नाही. या सहलीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग नसतो. त्यामुळे याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.

ग्रामीण रुग्णालयाला पन्नास बेडची मंजूरी मिळाली असल्याचे ही या वेळी सांगण्यात आले. 
शिरीष देसाई यांनी आदरांजलीचा ठराव मांडला. केबलसाठी महानेट कंपनीतर्फे तालुक्‍यातील रस्त्यावर ठिक-ठिकाणी खुदाई केली आहे, पण केबलसाठी खोदलेल्या चरी व्यवस्थित बुजवलेल्या नाहीत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या चरी बुजवाव्यात, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.

पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले की, "कोरोना' या व्हायरसबद्दल समाजात गैरसमज पसरले आहेत. हा रोग कोंबड्यांचे चिकन खाल्यामुळे होतो असा लोकांचा गैरसमज आहे. तो चुकीचा आहे. वणव्याबाबत नागरिकांनी जागृत रहावे. कुठे वणवा लागला तर त्यांनी वनविभागाशी तातडीने संपर्क साधावा. "एलिफंट गो बॅक' मोहीम राबविण्याबाबत मंजुरी मागवली आहे, असे वनविभागातर्फे सांगण्यात आले.

सामाजिक वनीकरण येथे संरक्षणाचे काम सुरू आहे. गावागावात दवंडी देवून "झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश दिला जात आहे. सामाजिक वनीकरणाला जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाला आहे, असेही या वेळी सांगण्यात आले. बांधकाम विभागाचे उपअभियंता बाळासाहेब कांबळे म्हणाले, ""सार्वजनिक बांधकामतर्फे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. चंदगड आजरा या रस्त्याचे काम सुरू आहे.'' पवार म्हणाले, ""वेळवट्टी येथे केबलसाठी खुदाई सुरू आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करून काम पुर्ण करावे.''

मुरुडे येथे रस्त्यामध्ये खड्डा काढला आहे. तो तातडीने बुजवून घ्यावा, अशी मागणी रचना होलम यांनी केली. पाटबंधारे विभागाचे अधिकारी म्हणाले, ""सर्फनाला प्रकल्पाचे काम सुरू आहे. दर महिन्याला आमदार आबिटकर यांच्याबरोबर आढावा बैठक घेण्यात येत आहे.'' जमीन क्षेत्र उपलब्ध असल्याने प्रकल्पग्रस्तांना जमिनी देण्यात येतील त्याप्रमाणे अर्ज द्यावेत.'' असेही या वेळी सांगण्यात आले. उपसभापती वर्षा बागडी यांनी आभार मानले. 

पोल्ट्री धारकांना अनुदान द्यावे 
आजरा तालुक्‍यातील पोल्ट्री धारकांची संख्या मोठी आहे. "कोरोना' विषाणुमुळे समाजात गैरसमज पसरलेला आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. पोल्ट्री धारकांना शासनाने मदत करावी. त्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी सभेत रचना होलम यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inquire For A Farmer Trip, Demand In Ajara Kolhapur Marathi News