
नऊ वर्षापासून हुपरीपासून आठ किलोमीटरवर असलेल्या बोरगाव (ता. चिक्कोडी) येथील सिद्धेश्वर गुऱ्हाळात फक्त तिसरी पर्यन्त शिक्षण घेतलेल्या कांचन धनपाल गोटूरे या महिला गुळव्याची ही कहाणी.
कोल्हापूर : उसाचा रस काहिलीत टाकला की तिचं काम सुरू होतं. रसातील मळी काढण्यापासून ते चूलवाणाच्या जाळाकडे क्षणांक्षणाला नजर, उकळणाऱ्या रसाचा रंग जस-जसा बदलतो, तसतसे तिचे लक्ष उकळणाऱ्या रसाकडे खिळून रहाते, तोंडावर येणाऱ्या वाफेच्या झळांचे चटके सोसत रसातला ‘गूळ’ शोधण्यासाठी तिची सर्व शक्ती एकवटते. हाताने फावड्याची हालचाल करत काहिलीत रसाची उधळण करण्याचे काम अव्याहत सुरू होते. रस उतू येऊ नये म्हणून जाळाचे प्रमाण सांगितले जाते. गूळ तयार झाला की, क्षणाचाही वेळ न दवडता रस गूळ करण्यासाठी वाफ्यात ओतला जातो. नऊ वर्षापासून हुपरीपासून आठ किलोमीटरवर असलेल्या बोरगाव (ता. चिक्कोडी) येथील सिद्धेश्वर गुऱ्हाळात फक्त तिसरी पर्यन्त शिक्षण घेतलेल्या कांचन धनपाल गोटूरे या महिला गुळव्याची ही कहाणी.
वीस वर्षापासून गुऱ्हाळघरावर घरातील तीन जणांसह त्या वेग-वेगळे काम साभांळत गुळव्याचा गोडवा शिकत आता नऊ वर्षापासून त्या गुळव्या म्हणून गुऱ्हाळाची जबाबदारी सांभाळत आहेत. गुऱ्हाळ घरांचा ‘गुळव्या’ हा आत्मा असतो. गुळाचा गोडवा, आकार, मऊपणा वाढविण्यासाठी ‘गुळव्या‘ची नजर खूप महत्वाची ठरते. रसापासून गुळ तयार करण्याची प्रक्रीया खुप अवघड असते. रस काहिलीत ओतल्यापासून त्यातील मळी काढणे, तो योग्य तपमानात उकळवणे, गुळाचे रवे करण्यास योग्य स्थिती निर्माण करणे हे अक्षरश: कौशल्याचे काम असते. यात चूक झाली की गुळाचा दर्जा बिघडलाच म्हणून समजा. इतका काटेकोरपणा आवश्यक असतो. गुऱ्हाळात महिलांकडून हे काम करणे तसे दुर्मिळच. बोरगाव येथील या गुऱ्हाळात सौ. कांचनताई हे काम आनंदाने व उत्साहाने करत आहेत.
हेही वाचा- मुलांच्या हातात वाहन देणे पालकांना पडणार चांगलेच महागात
मुलाची संकटावर मात...
कांचन यांच्या मुलाचा हात इंजिनच्या बेल्टला लागला. त्यात त्याला हात गमवावा लागला.परंतु मुलाचा हात गेला म्हणून कांचन यांनी गुळव्याचं काम सोडलं नाही. उलट मुलांन खंबीर होवून एका हातावर कंटेनरचं ड्रायव्हिंगला सुरुवात केली. आज कांजन आणि मुलगा तितक्याच उत्साहाने आपले काम पार पाडत आहेत.
संपादन- अर्चना बनगे