कोल्हापूर मार्केट यार्डात गूळ सौदे बंद पाडले 

सुनील पाटील
Friday, 30 October 2020

सध्या जवळपास पन्नास हजारांहून अधिक रव्यांची आवक होत आहे.

कोल्हापूर : वाढीव मजुरीसाठी आज माथाडी कामगारांनी अचानक बंद केल्याने हंगामात पहिल्यांदाच गुळाचे सौदे बंद पडले. जवळपास दीड तास चर्चेनंतर सात टक्के मजुरीवाढ देण्याचा निर्णय झाल्यानंतर सौदे पूर्ववत सुरू झाले. 

सध्या जवळपास पन्नास हजारांहून अधिक रव्यांची आवक होत आहे. अशा स्थितीत माथाडी कामगारांनी 20 टक्के मजुरी वाढीचा आग्रह खरेदीदारांकडे काल केला होता. त्याला खरेदीदारांनी नकार दिला होता. आज सकाळी शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजारात सौदे सुरू झाले त्याच वेळी माथाडी कामगारांनी मजुरीवाढीसाठी कामबंद आंदोलन केले. आंदोलनात सहभागी होणारे बहुतेक माथाडी खरेदीदार यांच्याकडे काम करणारे आहेत. सौदे झालेल्या गुळाचे पॅकिंग, वजन करणे, गुळ रवे गाडीत भरणे अशी कामे माथाडी कामगार करतात. 30, 20, 10 व पाच किलोच्या गूळ रव्यांची मजुरी दहा ते पन्नास रुपयांपर्यंत आहे. यात वीस टक्के वाढीची मागणी केली होती. 20 टक्के वाढीवर माथाडी ठाम राहिल्याने पेच निर्माण झाला. सुर्यकांत पाटील व जयवंत पाटील यांनी दोन्ही घटकांशी चर्चा करून तोडगा काढला. या वेळी समितीचे प्रशासक के. पी. पाटील ही यांनीही यामध्ये तोडगा काढत सात टक्के मजुरी वाढ केली. बाजार समिती सचिवांनी परस्परांमध्ये चर्चा घडवून सात टक्के वाढ देण्याचा निर्णय झाल्यानंतर आंदोलन मागे घेतले. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास पूर्ववत सुरू झाले. 

उत्पादांचीच कोंडी 
गुळाची आवक वाढते तेव्हा किरकोळ कारणावरून सौदे बंद पाडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गेल्या चार वर्षांत मात्र सौदे सुरळीत सुरू होते. गतवर्षी व यंदा माथाडी कामगारांनी पूर्वसूचना न देता काम बंद करून सौदे बंद पाडले. अचानक सौदे बंद पडू नयेत यासाठी काय उपाययोजना राबवणार याकडे गूळ उत्पादकांचे लक्ष आहे. 

हे पण वाचाधक्कादायक; 64 लाखांच्या दागिन्यांना चुना ; विक्रीच्या बहाण्याने कृत्य

वेठीस धरणे बंद करा 

गूळ हंगाम सुरू झाला की अनेकांना मागण्या आठवतात. सौदे सुरू होण्यापूवी किंवा गुऱ्हाळघरे सुरू होण्याआधीच प्रश्‍न निकालात काढले जात नाहीत. त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जातो. हे धोरण बंद करावे, अन्यथा शेतकरी स्वत:हून अचानक सौदे बंद करणाऱ्या घटकांवर कारवाई करतील, अशी अनेक शेतकऱ्यांनी भूमिका मांडली. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaggery deals closed at Kolhapur Market Yard