जयसिंगपूरला ताराराणी आघाडीतील बेदिली शाहू आघाडीच्या पथ्यावर?

Jaysingpur Municipal Politics Kolhapur Marathi News
Jaysingpur Municipal Politics Kolhapur Marathi News

जयसिंगपूर : शहर विकासाच्या मुद्द्यावरुन पालिकेतील शाहू आणि ताराराणी आघाडीत अखेर समेट झाला. विषय समितीच्या निवडीवरून यावर शिक्कामोर्तबही झाले. सव्वाचार वर्षात पालिकेतील सत्तासंघर्षातून निर्माण झालेल्या वादाची मोठी किंमत नागरिकांना मोजावी लागली आहे.

आघाड्यांमधील संघर्षात शहर विकासाची घुसमट झाली. निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही आघाड्यांमध्ये समेट झाला असला तरी उरलेल्या काळात अपेक्षित विकासकामांचे आव्हान नगरसेवकांना पेलावे लागणार आहे. 
गतवेळच्या निवडणुकीत नागरिकांनी ताराराणी आघाडीच्या पदरात मोठे यश टाकले असले तरी आघाडीला मात्र ते यश फार काळ टिकवता आले नाही.

दिशाहिन झालेल्या या आघाडीमुळे केवळ वादविवाद आणि हेवेदावेच पहायला मिळाले. नागरिकांनी मोठ्या विश्‍वासाने ताराराणी आघाडीला पुढे आणले. यातून नवे नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न झाला खरा पण हा प्रयत्नही दिवास्वप्न ठरला. ताराराणी आघाडीत एकमताचा कारभार नसल्याने आघाडीच्या नगरसेवकांचे शाहू आघाडीशीच जुळत गेले. 

शाहू आणि ताराराणीमधील बेदिलीमुळे सव्वाचार वर्षात शहरात विकासापेक्षा इर्षेच्या टोकाचेच राजकारण झाले. अवघ्या काही महिन्यांवर पालिकेची निवडणूक आल्यानंतर दोन्ही आघाड्यांमध्ये समन्वय झाला. मात्र, उरलेल्या काळात नागरिकांना अपेक्षित कामे करणे हेच मोठे आव्हान नगरसेवकांपुढे असणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदारांपुढे जाताना केलेले कामच विद्यमान नगरसेवकांना तारणार असले तरी अल्पावधीत कामे करायची कशी हा पेच आहे. यातच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने विकासकामांना पुन्हा मर्यादा आल्या आहेत. 

द्यावा लागणार कामाचा लेखाजोखा 
सात महिन्यांवर आलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नव्याने मतदारांपुढे जाताना विद्यमान नगरसेवकांना कामाचा लेखाजोखा द्यावा लागणार आहे. आपणच पुन्हा का हे मतदारांना पटवून देताना अनेक विद्यमान नगरसेवकांची गोची होणार आहे. काही नगरसेवकांनी ग्राउंडवर राहून छोटीमोठी कामे करून मतदारांचा संपर्क ठेवला आहे. तर काही नगरसेवकांनी निवडणूक झाल्यापासून सव्वाचार वर्षात साधा आभार दौराही केलेला नाही. 

नगराध्यक्षपदासाठी चुरस 
जनतेतून नगराध्यक्षऐवजी नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडीच्या निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे नगराध्यक्षपदासाठी अधिकाधिक नगरसेवक निवडून आणावे लागणार असल्याने आता प्रत्येक प्रभागात नेत्यांना लक्ष घालूनच नगराध्यक्ष पदाचा दावा करावा लागणार आहे. शिवाय एकसदस्यीय प्रभाग रचनेमुळे आता सर्वच प्रभागात उमेदवारांची भाऊगर्दी होणार असून यातून बाजी मारताना संभाव्य नगरसेवकांच्या नाकी नऊ येणार आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com