जयसिंगपुरात लवकरच प्रशस्त डी. वाय. एस. पी. कार्यालय

In jaysingpur Soon A Spacious D. Y. S. P. Office Kolhapur Marathi News
In jaysingpur Soon A Spacious D. Y. S. P. Office Kolhapur Marathi News

जयसिंगपूर : जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले आणि पेठवडगाव पोलिस ठाण्याचा कार्यभार असणाऱ्या येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त इमारतीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या भाड्याच्या इमारतीत कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. येथे पार्किंगच्या दृष्टीनेही गैरसोय होते. उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्‍वर वैंजणे यांच्या पुढाकाराने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असून नावीन्यपूर्ण उपक्रमातून हे कार्यालय उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागानेही आवश्‍यक कागदपत्रांची मागणी केली आहे. या इमारतीसाठी 50 लाखांच्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव दिला जाणार आहे. 

जयसिंगपूरमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. पहिल्या अधिकारी अश्‍विनी सानप-देवधर यांनी हेरवाडे कॉलनीत एका बंगल्यात हे कार्यालय सुरू केले होते. सध्याचे कार्यालय हे बाजारपेठेत असल्याने पार्किंगचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कार्यालयात यायचे असेल, तर आधी पार्किंगसाठी जागा शोधावी लागते. चार पोलिस ठाण्यांचा कारभार असणारी ही इमारत गैरसोयीची असून अधिकारी, कर्मचारी आणि पक्षकारांचीही अडचण होत आहे. 

तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी हा प्रश्‍न लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासाठी आरक्षित असणाऱ्या जमिनीवर प्रशस्त इमारतीचा प्रस्ताव पाठविण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळी त्यांची बदली झाल्याने हा प्रश्‍न तसाच होता. 

पिंगळे यांनीच या कार्यालयासाठी कोल्हापूर-सांगली महामार्गानजीक तीन गुंठे जमीन आरक्षित असल्याची माहिती घेऊन त्यांची कागदपत्रे मिळविली होती. यानंतर इमारतीचा मुद्दा पुढे आला. नव्याने रुजू झालेल्या वैंजणे यांनी इमारतीचे काम हाती घेतले आहे. विविध विभागांकडे त्यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून 50 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. 

अशी असेल प्रशस्त इमारत 
नव्याने दिल्या जाणाऱ्या प्रस्तावात अधिकारी, कर्मचारी आणि पक्षकारांची बैठक व्यवस्था, वाचक शाखा, विधी अधिकारी, गुन्हे विभाग, पत्रव्यवहार असे विभाग असतील. 

आयएसओ मानांकन 
जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयालयास आय. एस. ओ. मानांकन मिळाले आहे. मात्र, कार्यालयात जाण्यासाठी पार्किंगचीच व्यवस्था नाही. कार्यालयात जातानाच मनस्ताप सोसावा लागत असतानाही हे कार्यालय आय. एस. ओ. मानांकनप्राप्त आहे. 

पाठपुरावा सुरू
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचा कारभार बाजारपेठेतील भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. पार्किंगचा प्रश्‍नही भेडसावतो. कार्यालयासाठी आरक्षित जागेवर लवकरच इमारत उभी राहावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव सादर करू. 
- रामेश्‍वर वैंजणे, उपविभागीय पोलिस अधिकारी, जयसिंगपूर 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com