‘यायला लागतय’ म्हटले की दुचाकी गाडी घेऊन तयार असणाऱ्या ट्रक मेकॅनिक ते परिवहन सभापतीचा प्रवास

युवराज पाटील | Sunday, 25 October 2020

चंदू मेस्त्रींचा प्रवास; सामान्य कार्यकर्त्याला न्याय, बुधवारी होणार औपचारिक घोषणा

कोल्हापूर :  काल परवापर्यंत ‘अरे! मी केएमटी चेअरमन होणार आहे, असे चंदू मेस्त्रींना म्हटले तर त्यांना काहीजण खुळ्यात काढत होते. तुम्ही आणि चेअरमन, काय सांगताय राव, अशी थट्टा उडविली जायची. मात्र केएमटीच्या अडचणीच्या काळात जे मेस्त्री धाऊन आले तेच हे चंदू मेस्त्री. परिवहन सभापतीसाठी त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. बुधवारी (ता. २८) निवडीची औपचारिक घोषणा होईल. 

कोणत्याही सामाजिक प्रश्‍नावर आंदोलन आहे आणि मेस्त्री ‘यायला लागतय’ म्हटले की दुचाकी गाडी घेऊन ते पोहचलेच. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आपला फोटो छापून यावा, यासाठी धडपड नाही. नावाचा उल्लेख केला आहे, की हे ही ठाऊक नाही. मेस्त्रींची आंदोलनाची उपस्थिती मात्र कायम असणार, शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाच्या माध्यमातून कार्यरत असलेचे हेच ते चंद्रकांत सूर्यवंशी, बलभीम बॅंक बचाव कृती समिती, असो अथवा टोल कृती समितीचे आंदोलन,  बाजूला का असेना पण चंदू मेस्त्री नजरेस पडणारच? महापालिका सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपत आहे. मेस्त्रींची निवड केवळ १८ दिवसांसाठी आहे. कालावधी कमी मिळाला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून न्याय मिळाला, अशी सूर्यवंशी यांची भावना आहे. 

हेही  वाचा - ‘करू दे तो हत्ती पिकाची नुकसान ; हेलपाट्यांनी जीव घायकुतीला -

तत्कालीन परिवहन सभापती सुनील मोदी यांनी अमेरिकन पॅटर्न राबवून केएमटीला ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न केला. यात तीसहून अधिक गाड्या वर्कशॉपमध्ये पडून होत्या. त्या दुरूस्त करून केएमटीची िफ्रक्‍वेन्‍सी वाढणार होती. सूर्यंवंशी मुळात ट्रक मॅकेनिक, त्यांचे मित्र बाळासाहेब मुधोळकर हे त्यावेळी परिवहन समितीवर सदस्य होते. मुधोळकर यांनी सूर्यवंशी यांना सोबत घेऊन रिपेअरी होऊ शकणाऱ्या गाड्यांची अवस्था बघितली. अमूक एक पार्ट कसा दुरूस्त करायचा आणि जुन्या पार्टमध्ये गाडी कशी सुरू होऊ शकते याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. नंतर गाड्या रस्त्यावर धावल्या.

 

४० वर्षांपासून हातात पाना..
लक्ष्मीपुरीतील गॅरेज असो अथवा सध्याचे पांजरपोळ येथील गॅरेजमध्‍ये ४० वर्षांपासून चंदू मेस्त्रींच्या हातातील पाना सुटलेला नाही. नगरसेवक झालो नाही तरी आज ना उद्या कुठेतरी संधी मिळेल या आशेवर ते होते. राष्ट्रवादीच्या कोट्यातून परिवहन समितीवर गेलेल्या सूर्यंवशी यांनी ज्या केएमटीसाठी थोडेफार योगदान दिले त्याच समितीचे सभापती होत आहेत. थोड्या दिवसांची संधी मिळणार असली तरी पदाला जास्तीत जास्त न्याय देण्याची भूमिका राहील, अशी प्रतिक्रिया चंदू सूर्यवंशी यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

संपादन - अर्चना बनगे