प्राचीन काळापासून जोतिबा डोंगरावर सुरू असलेली 'ही' परंपरा आजही अखंडीत
जोतिबा डोंगरावरील सुहासिनी महिला करतात दिवे ओवाळणी..
जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर ता. (पन्हाळा ) येथे दरवर्षी खंडे नवमी दिवशी पहाटेच्यावेळी जोतिबा डोंगरावरील सर्व सुवासिनी महिला नटून थटून जोतिबा मंदिर व परिसरातील सर्व देव देवतांना दिवे ओवाळतात. प्राचीन काळापासून सुरू असलेली ही परंपरा आजही सुरू आहे. आजही हा सण जोतिबा डोंगरावर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो . पहाटे नटून-थटून सुहासिनींची पावले पावले मंदिराकडे वळतात. पायरी रस्त्याने दिवे घेऊन येताना चे दृश्य मोहून टाकणारे असते. मंदिरातील सर्व देव देवतांना ओवाळले जाते . सूर्योदयापूर्वी हा सोहळा होतो.
या सोहळ्या विषयी असे सांगितले जाते की, दख्यनचा राजा श्री जोतिबा देवाने रत्ना सूर , रक्तभोज या राक्षसासह आणखी पाच राक्षसांचा वध केला. विजयादशमी दिवशी दख्खनच्या राजा जोतिबा देवांनी हा पराक्रम केला म्हणून या पराक्रमाची आठवण म्हणून डोंगरावर पंचप्राण ज्योतीचे प्रतीक म्हणून सुवासिनीनी ही दिवे ओवाळणीची प्रथा सुरू केल्याचे सांगितले जाते . दिवे तयार करण्यासाठी तांदळापासून पीठ तयार केले जाते. ते चुलीवर शिजवले जाते . त्यापासून विशिष्ट आकाराचे दिवे तयार करून त्यात तूप व वातू घालून ते प्रज्वलीत करण्यात येतात. महिलांच्या लगबगीने संपूर्ण डोंगर जागा असतो . दरम्यान , यंदा दिवे ओवाळणीचा सोहळा कोरोना संसर्गामुळे अत्यंत साध्या पद्धतीने झाला .डोंगरावर या सणास मोठे पारंपारीक महत्व आहे .
जोतिबा डोंगरावर दिवे ओवाळणीची प्रथा आजही कायम आहे. आज कोरोनामुळे मंदिर बंद आहे. तरीसुद्धा बाहेरून आम्ही दिवे ओवाळणी करून ही प्रथा कायम ठेवली आहे. यंदा साध्या पद्धतीने हा सोहळा महिलांनी केला .
सौ राधा बुणे, सरपंच, जोतिबा डोंगर ता. पन्हाळा .
संपादन - अर्चना बनगे