
सापडलेल्या मोबाईलची परस्पर विल्हेवाट लावल्याचा ठपका
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील दवाखाना विभागात आणखी एक मोबाईल सापडला. त्या मोबाईलची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी कारागृहातील शिपायावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला. प्रशासनाला माहिती न देता तो मोबाईल दगडाने फोडून मुख्य तटाच्या बाहेर फेकून दिल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला आहे. सचिन नवनाथ रणदिवे असे त्या कारागृहातील संशयित शिपायाचे नाव आहे.
याबाबत पोलिस व प्रशासनाने दिलेली माहिती अशी
कळंबा कारागृहात काही दिवसांपासून मोबाईल प्रकरण गाजत आहे. मोटारीतून २२ डिसेंबरला आलेल्या संशयितांनी फडक्यात बांधलेले तीन पुडके कारागृहात फेकले. त्यात १० मोबाईल,
पाऊण किलो गांजा, चार्जर कॉड, दोन पेन ड्राईव्ह सापडले होते. त्यामुळे कळंबा कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले होते. प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत तत्कालीन अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी बदली केली होती. त्यांच्या जागी चंद्रमणी इंदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी सातत्याने कारागृहाची झडती घेण्याचे काम सुरू केले. यात २५ व ३१ डिसेंबर या दोन दिवशी एकूण दोन मोबाईल, सात बॅटऱ्या सापडल्या होत्या. यानंतर पाच जानेवारीला दोन मोबाईल, सिमकार्ड व दोन बॅटऱ्या मिळून आल्या होत्या. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने १० मोबाईलचा छडा लावून चौघांवर गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा- विजयापर्यंत पोचण्याचा राजमार्ग : मोठी कुटुंबं गळाला लावण्याचे प्रयत्न! -
सुरक्षिततेच्या दृष्टीने कारागृहाची अधीक्षक इंदूरकर यांच्या सूचनेनुसार विशेष झडती पथकाकडून कारागृहाची शुक्रवारी झडती घेतली. इंदूरकर यांना कारागृहातील दवाखाना विभागात मोबाईल असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या विभागाची सखोल झडती घेण्याची सूचना त्यांनी केली. या झडतीत कारागृह शिपाई संशयित सचिन रणदिवेला विभागात मोबाईल सापडला. याची माहिती त्याने प्रशासनाला दिली नाही. उलट हा मोबाईल दगडाने फोडला. त्यानंतर टॉवर क्रमांक एक येथील मुख्य तटाच्या बाहेर फेकून दिला. यातील मुख्य अपराध्याला वाचवून गुन्ह्यातील पुरावा नाहीसा करून कारागृहाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद तरुंगाधिकारी साहेबराव आडे यांनी दिली. त्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रणदिवेवर गुन्हा दाखल झाला. याबाबतचा तपास पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक आरती नांद्रेकर करीत आहेत.
संबधित शिपायाने हा प्रकार का केला, याची सखोल चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर त्याच्या कर्तव्यातील कुचराईबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.
- चंद्रमणी इंदूरकर, कारागृह अधीक्षक
संशयित शिपायावर पुरावा नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याच्यावर कारवाई करून या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल.
प्रमोद जाधव (पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा)
संपादन - अर्चना बनगे