
करवीर नगर वाचन मंदिर : कोल्हापूरचे ग्रंथपीठ
कोल्हापूर : १५ जून १८५०मध्ये कर्नल एच. एल. अँडरसन या पोलिटिकल सुपरिटेंडंटने नेटिव्ह लायब्ररी सुरू केली. १८६७ मध्ये युरोपियन लोकांनी या ग्रंथालयाकडे सभासद नसल्याने एजन्सी बुक क्लब अशी स्वतंत्र संस्था सुरू केली. १८७९ ते १८८१ मध्ये ही इमारत रुपये २७००० खर्च करून बांधण्यात आली. ग्रंथालय १८८२ पासून या नव्या इमारतीमध्ये सुरू झाले.
वास्तुउभारणीसाठी खर्च आलेल्या रकमेपैकी दरबार व कोल्हापूर नगरपालिकेने प्रत्येकी दहा हजार रुपये निधी दिला होता. पुढे देखभालीसाठी प्रतिवर्षी निधीची तरतूद गेली. उर्वरित निधी वर्गणी व स्वनिधीतून दिला गेला. हे वारसास्थळ म्हणजे करवीर नगर वाचन मंदिर अर्थात ...
१९२४-१९२५ मध्ये कोल्हापूर जनरल लायब्ररी या नावाने सुरू असलेली ही संस्था १९३४ पासून करवीर नगर वाचन मंदिर या नावाने कार्यरत झाली.१९४४च्या करवीर दरबारच्या कायद्यामुळे मध्यवर्ती वाचनालय आणि १९४९ पासून जिल्हा ग्रंथालय असा दर्जा प्राप्त झाला.१९८४ मध्ये पुन्हा विस्तार झालेल्या या वास्तूमध्ये जुन्या पोथ्या, हस्तलिखित तसेच इ. स.१८०० पासून प्रकाशित झालेली दुर्मिळ व महत्त्वाची पुस्तके संग्रहित आहेत.
या इमारतीची जागा कमी पडू लागल्यानंतर नजीकच्या जागेत बारा हजार रुपये खर्च करून वाचनासाठी प्रिन्स शिवाजी हॉल बांधण्यात आला.
हेही वाचा- मुख्यमंत्री सतत धमक्या देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ; चंद्रकांत पाटील
राजवाड्याला शोभून दिसेल अशी इमारत त्याच परिसरात असून, उत्कृष्ट दगडी घडीव खांबांच्या प्रवेश द्वारावरील मंडप देखणा आहे. त्यापुढे सभागृह लाकडी छत, नक्षीदार सजावट असलेल्या अंतरभिंती व पुस्तकांची लाकडी कपाटे हे भव्यता आणणारे आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित असलेल्या वि. स. खांडेकरांच्या नावाने इथे व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित करण्याची परंपरा तयार झाली आहे. सुरवातीच्या काळात पंधरा हजार ग्रंथांपैकी ७०७५ इंग्रजी व उर्वरित मराठी, संस्कृत भाषेतील ग्रंथ होते. सत्तरपेक्षा अधिक वृत्तपत्रे, नियतकालिके, सहाशे सभासदांसाठी उपलब्ध होती. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काम करू न शकणाऱ्या या महत्त्वाच्या संस्थांना आज वारसा इमारतीच्या संरक्षण, संवर्धनासाठी, नियमित देखभालीचा खर्च यासाठी निधी उभा करणे शक्य नाही. शासनाने विशेष अनुदान दिले तर त्यांची जपणूक होईल, यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहेच. शिवाय फेरीवाले, कचरा कोंडाळे, पार्किंग अशा दैनंदिन त्रासातून मुक्तता करणे आवश्यक आहे. राजाश्रयाबरोबरच समाजातील घटकांनी हा वारसा कायम ठेवण्यास आर्थिक जबाबदारी आपल्या परीनं घेतली पाहिजे.
दीड लाख पुस्तके अन् ४३०० सभासद
आज चार हजार तीनशे सभासद असून, दीड लाख पुस्तके आहेत. ९५ नियतकालिके येतात. सोळा हजार पाचशे दुर्मिळ संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. १९३० पूर्वीचे सर्व ग्रंथ स्कॅन करून जतन केले असून, वेबसाईटशी संस्था जोडली आहे. कमी जागेत पुस्तके ठेवण्याची व्यवस्था, अभ्यासिका, संगणकीकरण, झेरॉक्स, कुरिअरद्वारा पुस्तके असे नवे बदल स्वीकारून समकालीन योग्यता मिळवीत आहेत.
संपादन - अर्चना बनगे