"केशवराव'च्या भाड्यामध्ये  50 टक्के सवलत ; पालकमंत्री सतेज पाटील

 In Keshavrao's rent 50 percent discount; Guardian Minister Satej Patil
In Keshavrao's rent 50 percent discount; Guardian Minister Satej Patil

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये मार्चपर्यंत पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याशिवाय नाट्यगृहात अत्यावश्‍यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पापूर्वी पुन्हा बैठक घेऊन कायमस्वरूपी भाडे कमी करण्याबाबतचा निर्णय घेऊ, अशी ग्वाही आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. 
नाट्यगृहाचे भाडे कमी करावे आणि अन्य मागण्यांसाठी गेली काही दिवस नाट्य परिषद शाखा आणि रंगकर्मींतर्फे वारंवार पाठपुरावा सुरू होता. या पार्श्‍वभूमीवर आज नाट्यगृहात झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. माजी महापौर निलोफर आजरेकर, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे आदी उपस्थित होते. 

राज्यातील सर्व महापालिकांच्या नाट्यगृहाच्या भाड्याचा विचार केला तर "केशवराव'चे भाडे तुलनेत तिप्पट आहे. त्यामुळे ते कमी करावे, अशी रंगकर्मींची मुख्य मागणी आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री पाटील म्हणाले, ""सध्या एका प्रयोगामागे तीन ते चार हजारांचा तोटा महापालिकेला सहन करावा लागतो. इतर नाट्यगृहांच्या तुलनेत भाडे कमी करताना योग्य अभ्यास करून नियोजन करावे लागेल. त्यामुळे मार्चपर्यंत आहे, त्या भाड्यामध्ये नाटकांसाठी 50 टक्के सवलत दिली जाईल आणि त्यानंतर पुन्हा बैठक घेवून पुढील निर्णय घेतला जाईल.'' 

सुसज्ज तिकीट खिडकीघर, जाहिरातींसाठी फलक, स्पॉटलाईट, डिमर, पिण्याचे पाणी, अपंगांसाठी रॅम्पची सुविधा, संगीत नाटकांसाठी पडदे, ग्रीन रूम्समधील विविध सुविधा, फॅनची सुविधा आदींबाबतही बैठकीत चर्चा झाली. ही सर्व कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केल्या. रंगमंचावर आणखी पंधरा स्पॉटलाईट, रॅम्पची कामे लगेचच होतील, असेही त्यांनी सांगितले. नाट्य परिषदेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, मिलिंद अष्टेकर, गिरीश महाजन, विद्यासागर अध्यापक, सुनील माने, दीपक बिडकर, पंडित कंदले, सागर बगाडे, दिनेश माळी, प्रसाद जमदग्नी, सीमा जोशी आदी उपस्थित होते. 


दोन हजार क्षमतेचे नाट्यगृह निर्णय लवकरच 
शहरात दोन हजार क्षमतेचे सुसज्ज नाट्यगृह असावे, अशी मागणी आहे. त्यादृष्टीने पाठपुरावाही सुरू आहे. मात्र, कोरोनामुळे एक वर्षे कोणताच निर्णय घेता आला नाही. लवकरच याबाबत निर्णय घेऊन राज्याच्या येत्या अर्थसंकल्पात त्यासाठी निधी उपलब्ध करून देवू, असेही या वेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. 

मार्चनंतर दुसऱ्या टप्प्यातील कामे 
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील कामे निधी नसल्यामुळे प्रलंबित आहेत. दुसऱ्या टप्प्यातील या कामांसाठी येत्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाईल. त्यानंतर नाट्यगृहात आणखी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील, असेही पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com