कोल्हापुरातील खासगी रूग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय 'हा' इशारा 

kolhapur collector altimet to private hospital
kolhapur collector altimet to private hospital

कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश असलेल्या रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना दाखल करुन त्यांना योजनेचा लाभ द्यावा. दाखल करुन घेण्यास अथवा त्यांच्यावर उपचार करण्यास हलगर्जीपणा करु नये. साथ रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत खासगी रुग्णालयांनी अवास्तव देयके दिल्यास, त्याची लेखा पडताळणी करुन, अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल. प्रसंगी योजनेतून काढून टाकण्यात येईल. नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला. 

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत सहभागी असलेल्या कोल्हापूर शहरातील रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, विजय देवणे, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश असलेल्या शहरातील खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोना आणि सर्वसाधारण रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणे व जादा बील आकारणी असे प्रकार निदर्शनास येत आहेत. रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी शासनाने खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड आरक्षित केले आहेत. मग अशी रुग्णालये महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ठ असोत अगर नसोत. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णास प्रथम उपचार करण्यास रुग्णालयांनी प्राधान्य द्यावे. महात्मा जोतिराव फुले योजनेत समाविष्ठ असणाऱ्या रुग्णालयांनी कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यास चालढकल करुन रुग्ण दाखल करुन घेणार नाहीत अशा रुग्णालमध्ये या योजनेतून सुरु असलेले अन्य लाभ बंद करण्याची कारवाई करण्यात येईल. 

शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसारच आकारणी करुन खासगी रुग्णालयांनी कोव्हिड रुग्णांकडून बिले घ्यावीत. जादा दराने बील आकारणी करणाऱ्या रुग्णालयांची बिले सनदी लेखापालकडून तपासली जाणार आहेत. शासन दरापेक्षा जादा दराने बील आकरणी केल्याचे तपासणीत आढळून आल्यास संबंधित रुग्णालकडून जादा घेतलेले बील संबंधित रुग्णास परत दिले जाईल. तसेच दोषी आढळणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करुन प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. खासगी रुग्णालयांनी मांडलेल्या समस्यांचाही विचार केला जाईल, असेही जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले. ज्या खासगी रुग्णालयांना योजनेत समाविष्ठ व्हायचे आहे, त्या सर्वांना योजनेत समाविष्ठ करण्याबाबत शासनास प्रस्ताव पाठविण्यात येईल. 


आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, खासगी रुग्णालयांनी सामाजिक बांधिलकीतून कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यास पुढे यावे. कोरोना काळात प्रशासनास सहकार्य करुन कोल्हापूरचा लौकिक निर्माण करा. खासगी रुग्णालयातील बेड उपलब्धता आणि बील तपासणीसाठी महापालिकेमार्फत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच काल पासून प्रत्येक रुग्णालयासाठी महापालिकेच्या केमटी विभागाकडील 3 कोरोना योद्यांची नियुक्ती केली आहे. ऑडिटरने बिलाची तपासणी केल्याशिवास रुग्णास डिस्चार्ज दिला जाणार नाही. शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जादा दराने बील आकरणी केल्याचे निदर्शनास आल्यास अशा रुग्णालयांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली केली जाईल. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णास नातेवाईकामार्फत घरचे जेवण देण्यास अनुमती दिल्यास कोरोनाचा प्रसार प्रसार वाढू शकतो यासाठी खासगी रुग्णालयांनी रुग्णालयामार्फतच जेवण द्यावे, अशी सूचनाही डॉ. कलशेट्टी यांनी केली. 

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार व्हावेत तसेच खासगी रुग्णालयाकडून अवाजवी बील आकारु नये याबाबत प्रशासनाने संबंधितांना सूचना कराव्यात, असे श्री. श्री. पवार, देवणे यांनी यावेळी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com