esakal | नव्या वर्षात कोल्हापूर होणार ‘कंटेनर फ्री’ ; चौक घेणार मोकळा श्वास
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Container Free in New Year

कचरा कंटेनर हटविण्यास सुरवात : प्रायोगिक तत्त्वावर २३ प्रभागांतील कंटेनर हटवणार 

नव्या वर्षात कोल्हापूर होणार ‘कंटेनर फ्री’ ; चौक घेणार मोकळा श्वास

sakal_logo
By
युवराज पाटील

कोल्हापूर : शहरातील प्रमुख चौकात कचऱ्याने भरून वाहणारे कंटेनर आता नजरेस पडणार नाहीत. ‘कंटेनर फ्री सिटी’च्या दिशेने महापालिकेने संकल्प सुरू केला असून, प्रमुख रस्त्यावरील सर्व कंटेनर हटविले जाणार आहेत. ज्या २३ प्रभागांत दोन टिपर गाड्या कचरा जमा करतात तेथील कंटेनरही हटविले जातील.
अनलॉक उठल्यानंतर शहरात पर्यटकांची वर्दळ सुरू होईल.

एकीकडे ‘स्वच्छ व सुंदर शहर’ अशी घोषणा दिली असताना चौकाचौकातील कचऱ्याचे कंटेनर सौंदर्याला बाधा पोहचवत आहेत. रात्र अन्‌ दिवस कंटेनर कचऱ्याने भरून वाहतात. गल्लीगल्लीत घंटागाडी तसेच प्रभागात टिपर सुरू होऊनही कोंडाळ्यात कचरा टाकण्याची मानसिकता आहे. महापालिकेने त्यावेळी एक हजार कंटेनर व कचरा डंपर खरेदी केले होते. सध्या २५० कंटेनर कार्यरत आहेत. उर्वरित कंटेनर काढून टाकले आहेत.

हेही वाचा- शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागा बद्दल प्रश्‍नचिन्ह : सामान्यज्ञानावर प्रश्‍न कसे? -

१४ व्या वित्त आयोगातून १०४ टिपरची खरेदी झाली. ‘टाटा इंजिनिअरिंग’ने डीपीआर तयार केला. आणखी ६५ टिपर आता नव्याने खरेदी केले जाणार आहेत.  काळाच्या ओघात डंपरही मोडकळीस आले. पूर्वी शहरात कोंडाळे होते. सिमेंटचे गोल कचरा कोंडाळे शहराची लोकसंख्या मर्यादित त्यावेळी जागोजागी ठेवले गेले. नंतर कंटेनर आले. लोकवस्ती वाढत गेली तसे कचऱ्याचे प्रमाण वाढत गेले. नंतर कंटेनरची संकल्पना पुढे आली. ती ही मागे पडून नव्या वर्षात कंटेनर फ्री सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

कंटेनर काढल्यानंतर नागरिकांनी तेथे कचरा टाकल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात असतील. टिपर अथवा घंटागाडी आली नाही म्हणून कचरा उठाव झाला नाही, अशी तक्रार येऊ नये. यासाठी काळजी घेतली जाईल. रस्त्यावरील सर्वच कंटेनर हटविले जातील. 
- जयवंत पोवार, प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक

दृष्टिक्षेपात
  दररोज २०० टन कचरा गोळा       
  सध्या २५० कंटेनर कार्यरत 
  १०४ टिपरच्या साहाय्याने सुका आणि ओला कचरा संकलित 
  हा कचरा झूम प्रकल्पावर एकत्रित केला जातो 
  २३ पैकी १२ प्रभागांतील कंटेनर हटविले
  नवे ६५ टिपर आल्यानंतर ८१  प्रभागांतील  कंटेनर काढणार 

संपादन - अर्चना बनगे

go to top