कोल्हापुरात नेत्रदान, देहदानाला ‘ब्रेक’ :  संकल्प, अंतिम इच्छाही अपुऱ्याच

kolhapur Corona causes eye donation body donation break  No donations in six months
kolhapur Corona causes eye donation body donation break No donations in six months

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाले आहेत. आर्थिक घडी विस्कटली असून, नात्यागोत्यातील माणसे एकमेकांना भेटणेही अशक्‍य झाले; तर काहींना जवळच्याचे अंत्यदर्शन ऑनलाईन घेण्याची वेळ आली आहे. अशा वेळी नेत्रदान, देहदान केलेल्या अनेकांच्या अंतिम इच्छाही मृत्यूनंतर अपुऱ्या राहत आहेत. कोरोनामुळे अवयवदान आणि नेत्रदानाचा संकल्पही अपुरा राहत आहे. काहींचा देहदानाचा संकल्प असूनही मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला जातो.

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सर्वाधिक देहदान होतात. बायोस्कील लॅब असलेली महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. महाविद्यालयातर्फे देहदानाच्या संकल्पासाठी प्रचार मोहीम राबविण्यात येते. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राच्या अभ्यासासाठी हे मानवी मृतदेह वापरले जातात. देहदान संकल्पाचे प्रतिवर्षी सुमारे ५०० अर्ज नागरिकांकडून नेले जातात. यंदा केवळ २१३ अर्ज गेले असून, जानेवारी-फेब्रुवारीत आठ लोकांनी देहदान केले. पण, त्यानंतर एकही देहदान झालेले नाही. 


गतवर्षी याच काळात सुमारे २२ मृतदेह महाविद्यालयाकडे जमा झाले होते. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्टोरेजमध्ये एकूण ६० मृतदेह ठेवता येतात. सुमारे २९९ लोकांनी डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाकडे देहदान संकल्प केले आहेत. मेडिकलचे विद्यार्थी अभ्यासासाठी दरवर्षी सुमारे १५ मृतदेहांचा वापर करतात. राहिलेल्या अनेक मृतदेहांचा वापर बायोस्कील लॅब कार्यशाळेसाठी केला जातो. प्रत्यक्षात शस्त्रक्रियेवेळी हातात कशाप्रकारे स्कील असले पाहिजे, याचे ज्ञान कार्यशाळेतून मिळते. सुमारे ३० कार्यशाळा महाविद्यालयाने आयोजित केल्या आहेत. 

वैद्यकीय महाविद्यालयासाठी देहदान महत्त्वाचे असते. यंदा देहदान कमी आहे. स्टोअरेजमधील मृतदेहांचा वापर कार्यशाळेसाठी होतो. मात्र, यंदा प्रत्यक्ष कार्यशाळा होणार नसल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑनलाईन बायोस्कील लॅब कार्यशाळा घेणार आहोत.
- डॉ. आर. के. शर्मा, अधिष्ठाता, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय 
 

यंदा कोरोनामुळे महाविद्यालय बंद असल्याने मुलांना अभ्यासासाठी मृतदेहांची गरज भासत नाही. येथील स्टोअरेज अनेकांचे मृतदेह ठेवण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. देहदानाचा मृतदेह आणण्यासाठी दोन सुसज्ज व्हॅन उपलब्ध आहेत. 
- प्रा. डॉ. सुधा निकम, शरीरशास्त्र विभागप्रमुख
 

नेत्रदान हे मृत्यूनंतर काही तासांत द्यायचे असते. सध्या मृत्यूचे कारणही समजत नाही किंवा मृतदेहही परस्पर दहन होत आहेत. साधारणपणे महिन्याला आठ ते दहा नेत्र मिळत होते. पण, या सहा महिन्यांत एकही नेत्रजोडी दान मिळालेली नाही.
- डॉ. अतुल जोगळेकर, नेत्ररोग तज्ज्ञ

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com