...तर इचलकरंजीची भिवंडी, मालेगाव होईल 

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 2 जुलै 2020

जिल्हा प्रशासन इचलकरंजीच्या लॉकडाऊन बाबत लवकरच आपला निर्णय जाहीर करत आहे.

कोल्हापूर : इचलकरंजीमध्ये समूह संसर्गामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जीवापेक्षा उद्योग, व्यवसाय, रोजगार महत्वाचा नाही. त्यामुळे कोरोनामुळे इचलकरंजीचे भिवंडी आणि मालेगाव होण्याआधीच काही दिवस कडक लॉकडाऊन करावे, अशी मागणी इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी आज केली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 
दरम्यान, जिल्हा प्रशासन इचलकरंजीच्या लॉकडाऊन बाबत लवकरच आपला निर्णय जाहीर करत आहे.

कोरोना संसर्गाचा हाहाकार इचलकरंजी शहरात सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाच्या रूग्णामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. काल आठव्या दिवशीही ती वाढ तशीच राहिली. शहरातील त्रिशुल चौक येथील 4 तर गुरूकन्ननगर येथील दोघेजण काल कोरोना पॉझिटिव्ह आले. यामुळे आता शहरातील कोरोना रूग्णांची संख्या तब्बल 46 वर जावून पोहचली आहे. 

शहरातील गावभागातील त्रिशुल चौक येथील एका नागरिकास कोल्हापूरच्या सीपीआर रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. या व्यक्तीचे निधन झाले. त्यामुळे तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना संबंधीत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले होते. प्रशासनाने तातडीने अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या तसेच संपर्कात आलेल्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील संबंधीत मृत व्यक्तीचे 4 नातेवाईक आज पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये त्या व्यक्तीच्या भाचा, पुतणी, मुलगा आणि पुतण्या यांचा समावेश आहे. याशिवाय अन्य काही अहवाल अद्याप आलेले नाहीत.

हे पण वाचा - शिवाजी विद्यापीठाच्या कुलगूरूपदासाठी हे दिग्गज आहेत इच्छु!
 

गुरूकन्ननगर या ठिकाणीही रूग्ण संख्या वाढत आहे. यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या एका व्यक्तीच्या घरातील दोघेजण पुन्हा आजच्या अहवालात पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या परिसरातही खळबळ माजली आहे. आज ज्या परिसरातील रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत ते दोन्ही भाग अंत्यत दाट लोकवस्तीचे व अधिक संपर्कातील आहेत. त्यामुळे या भागात भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान शहरातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 46 वर जावून पोहचली आहे. यातील तीन व्यक्तींचे निधन झाले असून सहाजण उपचार घेऊन घरी परतले आहेत. शहरातील वाढता संसर्ग पाहता आता शहर आणि परिसरातील गावातही प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur district administration is announcing its decision on Ichalkaranji's lockdown soon