पतीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर धक्‍क्‍याने पत्नीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा | Friday, 1 January 2021

प्रांताधिकारी ते पालकमंत्री या सर्वांना निवेदन देवून धरणग्रस्तांनी याकडे लक्ष वेधले आहे

गडहिंग्लज : रात्री दोनच्या सुमारास धरणग्रस्त शेतकरी राजाराम गोविंद पावले यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच दिवशी त्यांची पत्नी साखरूबाई पावले यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यात त्या आजारी पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आंबेओहोळ धरणग्रस्त व पावले कुटूंबियांनी केला आहे. यासाठी कारणीभूत असलेल्या कृष्णा खोरे पाटबंधारे अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. 

प्रांताधिकारी ते पालकमंत्री या सर्वांना निवेदन देवून धरणग्रस्तांनी याकडे लक्ष वेधले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आंदोलनावेळी काही धरणग्रस्तांवर गुन्हा दाखल झाला आहे. यात राजाराम पावले यांचाही समावेश आहे. याप्रकरणी त्यांना 8 डिसेंबर रोजी रात्री दोनच्या सुमारास ताब्यात घेतले. यामुळे पत्नी साखरूबाई यांना जबर धक्का बसला. त्यात त्या आजारी पडल्याने त्यांना गडहिंग्लजमधील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. 

दरम्यान, पतीला खोट्या केसमध्ये अडकवल्याने त्यांचे अन्न-पाणी बंद झाले. अखेर या धक्‍क्‍यातून त्या सावरल्या नाहीत आणि 30 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. या धरणग्रस्त महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी. कट रचून धरणग्रस्तांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचा लेखी पुरावाही असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कृष्णा खोरेचे अधिकारी स्मिता माने, दिनेश खट्टे व शाखा अभियंता बारदेस्कर यांची चौकशी करून कारवाई आणि धरणग्रस्तांना न्याय द्यावा, अशी मागणी आहे.

Advertising
Advertising

हे पण वाचा हाकेला साद न देता पाण्याबाहेर येण्याऐवजी त्या पुढे-पुढे जात राहिल्या 

जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, सदानंद व्हनबट्टे, महादेव खाडे, संभाजी पावले, सुमन पाटील, दौलत पाटील, वंदना पावले, बेबीताई शिवणे, आशिष जाधव, अक्षय मेंगाणे, शरद शिवणे आदींच्या सह्यांनी हे निवेदन प्रांत कार्यालयात दिले आहे.  

संपादन - धनाजी सुर्वे