दुसरी लाट आली तर मुकाबल्यासाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा | Sunday, 25 October 2020

आरोग्य विभागाचे बेड संख्या वाढवणे, औषधांसाठी नियोजन 

कोल्हापूर : जगभरातील काही राष्ट्रांत कोरोना संसर्गाची दुसरी लाट धडकली आहे. जिल्ह्यात दुसरी लाट नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये येण्याची शक्‍यता गृहीत धरून आरोग्य विभागाने आतापासून नियोजन सुरू ठेवले. या लाटेच्या मुकाबल्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असेल. औषधे, जादा बेड, प्रशिक्षित कर्मचारी अशा सर्व पातळ्यांवर नियोजन करण्यात येत आहे. 

सात महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आहे. रुग्णसंख्या ५० हजारांच्या टप्प्यात गेली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तर कोरोनाचा कहर झाला. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा धसका घेतला होता. मात्र, कोरोनाचा कहर ऑक्‍टोबरमध्ये कमी झाला आहे. रोज तीनअंकी संख्येत आढळणारे कोरोनाग्रस्त आता ५० पेक्षा कमी झाले. रुग्णसंख्या कमी झाल्याने वातावरण पूर्वपदावर येत आहे. परिणामी, रस्त्यांवर पूर्वीसारखी गर्दी होऊ लागली. या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न होणे, मास्कचा वापर न करणे यासह मागील दोन महिन्यांत बरे झालेल्या कोमॉर्बिड व वयस्कर रुग्णांची प्रतिकारशक्‍ती कमी झाल्यास आणि पुन्हा नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता गृहीत धरून आरोग्य यंत्रणेने नियोजन केले आहे.

जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिक थोडे बिनधास्त वावरत आहेत. आरोग्य यंत्रणेवरील ताण थोडा कमी झाला असला तरी कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून नियोजन करण्यात येत आहे. सध्या पोस्ट कोविडच्या अनुषंगाने जे रुग्ण बरे झाले, मात्र ज्यांना त्रास होतो, त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचार 
सुरू आहेत. बहुतांश रुग्णांना रक्‍तात गुठळ्या होण्याचा त्रास होतो. यासाठीची औषधे आरोग्य यंत्रणांना देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांतून योगासने, प्राणायाम, ध्यानधारणाही शिकवली जात आहे.

हेही वाचा- राजकीय आखाड्याचे वारसदारांना आकर्षण ; सोशल मीडियाद्वारे प्रभागांवर छाप -

दुसरी लाट आली तरी तिचा सामना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अतिरिक्‍त बेड, औषधांचे नियोजन करण्यात आले. सध्या तरी राज्यस्तरावरून याबाबत कोणतेही मार्गदर्शन आलेले नाही. जगभरातून कोरोनाची उपलब्ध होत असलेली माहिती व त्या अनुषंगाने कृती यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. 
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

अशी असेल सज्जता
रुग्णसंख्या कमी झाल्याने सध्या ३७ कोविड सेंटर बंद आहेत. आरोग्य विभागाकडील अधिकारी आणि कर्मचारी नियमित कामात व्यस्त आहेत. कोरोना सेंटरमधील साहित्य मात्र तेथेच आहे. लाटेचा अंदाज येताच ही कोविड सेंटर सक्रिय केली जाणार आहेत. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना कोविड कर्तव्यावर घेतले जाईल. लाट कोणत्या भागात येईल. किती बेड वाढवायचे, याचा अंदाज घेऊन कार्यवाही होईल.

संपादन - अर्चना बनगे