कल कोल्हापूर महापालिकेचा : स्वबळावर लढवण्याचे मत आणि काँग्रेसकडे कल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवावी, असे ८२.८ टक्के नागरिकांनी मत व्यक्त केले.

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असल्यामुळे अनेकांना त्या पद्धतीनेच महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्र येतील असे वाटत होते. याविषयी नागरिकांना थेट विचारले असता सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवावी, असे ८२.८ टक्के नागरिकांनी मत व्यक्त केले. ९.८ टक्के नागरिकांनी याबाबत आपले कोणतेही मत नसल्याचे म्हटले आहे. यावरून स्थानिक निवडणुकीत संदर्भ वेगवेगळे असल्याचेही दिसून येत आहे. स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे; पण आता नागरिकांनाही अशीच लढत अपेक्षित असल्याचे दिसून येते. स्वबळावर निवडणूक लढवावी, असा नागरिकांचा कल असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोणत्या पक्षाला पसंती देणार, याविषयीही नागरिकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामधून सद्यःस्थितीत पुढीलप्रमाणे ...

निष्कर्ष समोर आले आहेत. सध्याच्या स्थितीनुसार यामध्ये ४०.८ टक्के नागरिकांनी काँग्रेस पक्षाला पसंती दिली आहे. १६.९ टक्के नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती दिली आहे. १५ टक्के नागरिक शिवसेनेच्या बाजूने जाणार असल्याचे सांगतात, तर भारतीय जनता पक्षाला पसंती देणाऱ्यांची संख्या १६.९ टक्के आहे. १०.१ टक्के नागरिक अपक्ष उमेदवारांच्या मागे उभे राहणार असल्याचे सांगत आहेत. मावळत्या सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता असून शिवसेनेने नेहमीच सोयीची भूमिका घेतली. सत्ताबदल घडविण्यासाठी भाजप व ताराराणी आघाडी कसून तयारीला लागली आहे. गेल्या निवडणुकीत थोड्या फरकाने विजय निसटला असून त्यांची रणनीती सुरू आहे. 

त्यानंतर प्रभागांतून कोणत्या पक्षाला अधिक पसंती  मिळेल, याचा कलही समजून घेण्यासाठी नागरिकांची मते जाणून घेतली. यामध्ये ४२.१ टक्के नागरिकांना आपल्या प्रभागात काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल असे वाटते. १७.३ टक्के नागरिकांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील. १६.३ टक्के नागरिक आपल्या प्रभागात भाजपच्या उमेदवारांना पसंती देत आहेत. १४.५ टक्के नागरिक शिवसेनेचे उमेदवार प्रभागातून निवडून येतील असे सांगतात; तर ९.६ टक्के नागरिकांना अपक्ष उमेदवारांच्या विजयाबद्दल खात्री वाटते आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur municipal corporation issues are important to citizens survey election 2021 by daily sakal