कल कोल्हापूर महापालिकेचा :अपुरा पाणीपुरवठा व सांडपाणी हीच प्रमुख समस्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

शहरातील बऱ्याच प्रभागांत झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. येथील २६ टक्के नागरिकांनी ‘झोपडपट्टी पुनर्वसन’ ही समस्या असल्याचे मत नोंदवले आहे.

कोल्हापूर : शहरापुढे म्हणून ज्या समस्या असतात, तशाच पद्धतीच्या अनेक समस्या प्रभागांपुढे आहेत. या समस्या विविध प्रकारच्या असतात आणि नागरिकांना रोज त्याला तोंड देत त्रास सहन करावा लागतो. प्रश्‍नावलीच्या माध्यमातून प्रभागातील समस्यांबाबत नागरिकांना विचारणा केली असता अनेकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. वर्षानुवर्षे त्याच समस्यांना नागरिक तोंड देत आहेत. ४७.९ टक्के नागरिकांच्या मते, मलनिस्सारण (ड्रेनेज) ही सर्वांत मोठी समस्या प्रभागात आहे.

 विशेषतः उपनगरांत त्याचे प्रमाण अधिक आहे. अपुरा व अस्वच्छ पाणीपुरवठा ही समस्या वर्षानुवर्षे चालत आलेली असून, आजही ४६ टक्के नागरिक या समस्येने त्रासलेले आहेत. याचाच अर्थ, अजूनही प्रभागातील ५० टक्के नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होतच नाही. ‘कोरोना’च्या आक्रमणामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले. ४१.६ टक्के नागरिकांच्या मते, महापालिकेची आरोग्य सेवा अधिक सक्षम व्हायला हवी. गेल्या दोन वर्षांत महापालिकेने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाला महत्त्व दिले आहे. 

प्रभागातील कचरा संकलित होऊ लागला. तरीदेखील ४१.२ टक्के नागरिकांना कचऱ्याची समस्या भेडसावते आहे. केंद्र सरकारच्या योजनेतून शहराच्या बहुतांश भागात एलईडी दिवे बसवले आहेत; पण अजूनही ३४ टक्के नागरिक प्रभागात पथदिव्यांची समस्या असल्याचे सांगतात. उपनगरांत केएमटीच्या फेऱ्या आवश्‍यकतेपेक्षा कमी असल्याने २०.८ टक्के नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची बाब गंभीर असल्याचे मत नोंदवले आहे. शहरात ५४ झोपडपट्ट्या आहेत. झोपडपट्टी पुनर्वसनासाठी शासनाच्या विविध योजना आहेत; मात्र त्यांची अंमलबजावणी शहरात फारशी झालेली दिसत नाही. शहरातील बऱ्याच प्रभागांत झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. येथील २६ टक्के नागरिकांनी ‘झोपडपट्टी पुनर्वसन’ ही समस्या असल्याचे मत नोंदवले आहे.

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur municipal corporation issues are important to citizens survey election 2021 by daily sakal