महापालिकेचा कर्मचाऱ्यांना विमा कवचही देणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

महापालिकेचे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले, तर त्यांचा पगार कापणार नाही, शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना विमा कवच दिले जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने आज स्थायी समितीत दिली.

कोल्हापूर : महापालिकेचे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले, तर त्यांचा पगार कापणार नाही, शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना विमा कवच दिले जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने आज स्थायी समितीत दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संदीप कवाळे होते. 

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही सभा झाली. कोरोना काळात काम करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांचाही विमा उतरवावा, त्यांनाही विमा कवच द्यावे, अशी मागणी विजय सूर्यवंशी यांनी केली. 
राजाराम गायकवाड म्हणाले, शहरातील सांडपाणी निर्गतव्यवस्थेचे नियोजन नाही. महापालिकेचे पैसे वाया जाणार आहेत. शारंगधर देशमुख म्हणाले, महापालिकेने गणपती उत्सवाचे काय नियोजन केले आहे. याबाबत बुधवारी बैठक घेऊ. शहरातील मोठ्या मूर्ती 80 टक्के इराणी खणीकडे येतात. त्याचप्रमाणे विसर्जन झाल्यावर दुसऱ्या दिवसापासून खणीतील पाण्याचा वास येतो. 

ग्रामीण भागातील रुग्ण व मयत व्यक्ती याची जबाबदारी महापालिकेवर का? ग्रामीण भागातील राजकारणामुळे कोविड रुग्णांना गावात घेत नाहीत. त्याचा भुर्दंड महापालिकेस का? कोविड रुग्णांना ज्या त्या गावात पाठवण्यात यावे. तेथील प्रशासनाची ती जबाबदारी आहे. महानगरपालिका चांगले काम करते; परंतु ही यंत्रणा आता अतिताणामुळे कोलमडून जाईल. महापालिकेचा कर्मचारी पॉझिटिव्ह आला, तर त्याला कामावर हजर दाखवून पगार द्यावा. त्याचा पगार कपात करण्यात येऊ नये. हे कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत. त्यांच्यावर मोफत उपचार करावेत. 

अन्यथा महापालिकेला घेराओ 
विजय सूर्यवंशी म्हणाले, महापालिकेने पर्यायी म्हणून दिलेल्या जागेवर घरे बांधली; पण अजून जागा नावावर नाहीत. त्यात संबंधितांनी चूक केली का? पैसे भरून घ्या. सर्वांना खरेदीपत्र करून द्या. अन्यथा संबंधितासह महापालिकेला घेराव घालू. लोक पैसे भरायला तयार आहेत. त्यांचे 2000 साली दहा हजार खरेदीपत्र करण्यासाठी लागायचे; पण आज दोन लाख भरावे लागणार आहेत. याला जबाबदार कोण? 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur Municipal Corporation will also provide insurance cover to its employees

टॉपिकस
Topic Tags: