'धुरळा' आला कोल्हापूरकरांच्या मुळावर...

 Kolhapur polluted sity Twenty cities in Report by Greenpeace India
Kolhapur polluted sity Twenty cities in Report by Greenpeace India

कोल्हापूर - वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहराचा श्‍वास दिवसेदिवस अधिक कोंडत असताना हवा प्रदूषणाबाबत राज्यातील वीस शहरांत कोल्हापूरचा समावेश झाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वायू प्रदूषणाच्या अहवालात स्थान कायम राखण्याची परंपरा शहराने कायम ठेवली आहे. ग्रीनपीस इंडिया या संस्थेच्या अहवालात राज्यातील वीस शहरांचा समावेश केला आहे.

कोल्हापूर प्रदूषित वीस शहरांत ; ग्रीनपीस इंडियाचा अहवाल

अतिसूक्ष्म कणांबाबत मुंबई शहर सर्वांत प्रदूषित ठरले आहे. डोंबिवली, चंद्रपूर, उल्हासनगर, ठाणे, पुणे, अमरावती, जालना, लातूर, नागपूर, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, सोलापूर, अकोला, औरंगाबाद, नवी मुंबई, भिंवडी या शहरातील हवेची गुणवत्ता राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकापेक्षा अधिक आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या हवा प्रदूषणाबाबत असलेल्या मानकापेक्षा आठपट अधिक आहे. देशात २०१९ मध्ये पहिला राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम जाहीर झाला. २०२४ पर्यंत प्रदूषणाचे प्रमाण वीस ते तीस टक्क्‍यांनी कमी करण्याचे लक्ष्य देण्यात आले. वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्याऐवजी ते वाढत असल्याचे स्पष्ट होते.

शहराचा विचार करता दररोज सुमारे लाखाहून अधिक वाहने रस्त्यावर धावत आहेत. रस्त्याच्या लांबी रूंदीच्या तुलनेत वाहनांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातून कामानिमित्ताने ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या वर्षापासून रस्त्यांची अवस्था वाईट आहे. खड्ड्यात वाहन गेल्यानंतर त्यातून उडणाऱ्या धुरळ्यामुळे नागरिक हैराण आहेत. हवा प्रदूषण कमी करण्याचा एक भाग म्हणून शहराच्या विविध भागात सायलेंट झोन जाहीर झाले. हे झोन कागदोपत्री राहिले आहेत. शहराचा भौगोलिक आकार कमी असला तरी वायू प्रदूषणाचे प्रमाण मात्र अधिक असल्याचे अहवालातून स्पष्ट होते.

मुंबई अथवा नवी मुंबईवर भल्या सकाळी धुक्‍याची चादर दाटून येते ते पाहून अनेकांना ते धुके असल्याची जाणीव होते. प्रत्यक्षात ते हवा प्रदूषणाच्या अतिसूक्ष्म कणांनी गर्दी केलेली असते. कोल्हापूरची अवस्था येत्या काही वर्षात याच पद्धतीने झाली तर कुणाला आश्‍चर्य वाटू नये.

औद्योगिक नव्हे तर वायू प्रदूषण

शहरात उद्यमगर, लगतच्या दोन औद्योगिक वसाहती, पंचतारांकित एमआयडीसीतून अन्य शहरांच्या तुलनेत वायू प्रदूषण होत नाही; मात्र शहरावर चारचाकी, तसेच दुचाकी वाहनांचा इतका मारा आहे की त्यातून बाहेर पडणारा धूर आणि रस्त्यांवरील धुरळा यामुळे प्रदूषित शहरात कोल्हापूरचा समावेश कायम राहिला आहे. महापालिका तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्तरावर उपाययोजना केल्या जातात, मात्र दीर्घकालीन नसल्याने त्याचे परिणाम फारसे दिसून येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com