कर्ते पुरुष गेल्यानंतरही संघर्षातून लढताहेत कोल्हापूरच्या या" माऊली

kolhapur Shubhangi Patil family struggle story by sandeep khandekar
kolhapur Shubhangi Patil family struggle story by sandeep khandekar

कोल्हापूर : ‘माझा मुलगा अमरचा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. नवरा गेल्यानंतर त्याचा आधार होता, तोही मोडून पडला. त्याच्या मृत्यूमुळे सून आजारी पडली. ती अडीच महिने दवाखान्यात ॲडमिट होती. तिला धीर देताना मलाही हुंदका फुटायचा. तिला सावरलं आणि चहाच्या गाडीवर लक्ष दिलं. नात सिमरन आता इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात, तर धनश्री दहावीला आहे. मुलगा जाऊन सहा वर्षे झाली. आयुष्यात थांबून चालत नाही. अडचणींचा सामना करायला शिकलं पाहिजे...’ फक्कड चहासाठी प्रसिद्ध असलेल्या शुभांगी मोहन पाटील सांगत होत्या. 


वयाच्या सदुसष्टाव्या वर्षातही त्यांच्या शरीराला दम नव्हता. उकळत्या तेलावर त्यांची नजर स्थिरावली होती. शेजारी सून वैष्णवी ग्राहकांना चहा, कॉफी, वडापाव देण्यात व्यग्र होत्या. कोणाला वाटेल मायलेकींची ही चहागाडी; पण सासू-सुनेच्या चहाचा गोडवा त्यांच्या नात्यातही उतरलाय. ३५ वर्षांपासून चहागाडी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात ‘हिट’, तर सासू-सुनेचे माय-लेकीसारखे नाते ‘सुपरहिट’ ठरले आहे. शुभांगी या सरनोबतवाडीतील मनीषा कॉलनीत राहतात. जागृतीनगर त्यांचे माहेर. तिथेच त्यांची खाणावळ होती. जेवणासाठी शंभर मुले-मुली त्यांच्याकडे यायची. पती मोहन यांची रेल्वे फाटकावर चहागाडी होती. पुढे सम्राटनगरच्या चौकात काही वर्षे तिचा मुक्काम होता. अमरने शिवाजी विद्यापीठाच्या फुटपाथवर चहागाडी सुरू केली. चहा व वडापावसाठी तो फेमस होता. विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांशी त्याचे ऋणानुबंध होते. त्याचा कवठेमहांकाळच्या वैष्णवी यांच्याशी विवाह झाला. 


फुटपाथवरून चहागाडी प्रौढ निरंतर विभागासमोर हलली. अमरकडे जाणारे ग्राहक मात्र थांबले नाहीत. दुर्दैवाने त्याचा २०१४ ला मृत्यू झाल्यानंतर घरची जबाबदारी सासू-सुनेवर पडली. दोघींचे संघर्षातून दिवस काढणे आजही सुरू आहे. चहागाडीवर काम करुन त्या घरखर्च पेलत आहेत. विद्यापीठातील चार शिक्षकांचे जेवणाचे डबे घेऊन त्या सकाळी चहागाडीवर हजेरी लावतात. आठ बाय चारची चहागाडी त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनली आहे. दोन्ही मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी परिश्रम घेत आहेत. 

माझ्या सासूबाई आईपेक्षा जास्त प्रेम माझ्यावर करतात. माझी काळजी घेतात. त्या लढवय्या स्वभावाच्या आहेत. त्यांचा कामातील उत्साह दिवसभर असतो. 
- वैष्णवी अमर पाटील 

मुलींच्या शिक्षणासाठी धडपड
संचारबंदीच्या काळात दोघी घरी होत्या. कॉलनीतील रहिवाशांकडून वडापावची ऑर्डर स्वीकारत होत्या. घरखर्चासाठी पैशाची आवश्‍यकता असल्याने त्यांना स्वस्थ बसणे शक्‍य नव्हते. सिमरन व धनश्रीच्या शिक्षणाकडे त्यांना दुर्लक्ष करायचे नाही. उषाराजे हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारी धनश्री ॲथलिट आहे. दोघींच्या उच्च शिक्षणात पैशाविना खंड पडू नये, असे त्यांना वाटते.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com