कोल्हापूर चालू, मग पन्हाळा बंद का ? 

Kolhapur on, then Panhala closed?
Kolhapur on, then Panhala closed?

पन्हाळा :  रविवारची सकाळची वेळ...आकाशात पांढरे ढग सुर्याच्या किरणांना अडवतेले..त्यामुळे वातावरण पावसाळी नसले तरी सुस्तावलेले... साधारण पन्नासभर सायकलस्वार घाम पुसत.. हाssश्‍शss हुश्‍शss करत पन्हाळगडावरच्या प्रवासीकर नाक्‍यावर आले... नाका कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले... आत प्रवेश नाही असे सुनावले... दमून भागून आलेले सायकलस्वार तंडू लागले.. आम्ही कोल्हापुरातून आलोय.. आम्हाला कुणीच अडवले नाही... रस्त्यावरही कुणी हटकले नाही.. तुम्ही अडवणारे कोण ..? असे विचारत पाण्याच्या बाटल्या पाठीवरच्या सॅकमधून बाहेर काढून तलावाच्या कटयावरच विराजमान झाले.. त्यांच्या पाठोपाठ मोटरसायकल वरून पांढराशुभ्र ड्रेस घातलेला 15 ते 20 जणांचा ग्रुप आला..

आज जागतिक योगा दिन.. आम्ही ऐतिहासिक गडावर योगा करायला आलोय.. त्यांनाही कर्मचाऱ्यांनी अडवले.. वाद घालत त्यानी चार दरवाजातील वीर शिवा काशिद पुतळयासमोरच योगाचे धडे गिरवले.. पाठोपाठ दर रविवारी पन्हाळयाला चालायला येणारा डॉक्‍टरांचा ग्रुप आला..त्यांनी समंजसपणे आपल्या चार चाकी वाहने नाक्‍यासमोरील रिकाम्या जागेत लावल्या आणि ते नागझरीमार्गे चालत पावनगडाकडे गेले. 

आज सूर्यग्रहण असल्याने फारशी कुटुंबे वाहने घेवून दुपारी आल्या नाहीत.. पण युवकांचे गट मात्र एकामागोमाग एक येतच राहिले. सायंकाळी बऱ्याच चारचाकी वाहने आल्या आणि त्यांनी नाका परिसरात रस्त्यावरच वाहने लावून चार दरवाजाच्या तिस-या दरवाजातून चढ चढत चौथ्या दरवाजाच्या कमानीतून वर जात सरळ संरक्षक बुरुज गाठला नि कुणाचे तटबंदीवर तर कुणाचे बुरजावर फोटोशुटींग चालू झाले. पन्हाळा बंद आहे हे माहित असल्याने सोबत आणलेल्या खाद्यपदार्थांचा हसत खेळत स्वाद घेण्यास सुरवात केली.या परिसरातही हिरवाई भरपूर प्रमाणात असल्याने तसेच चढ-उतार, गुहा असल्याने हा परिसरही पर्यटकांच्या नजरेत बसू लागला आहे. काही जण चढ चढून लता मंगेशकर बंगल्याकडून तटबंदीवरून चालत तीन दरवाजा परिसरात दाखल झाले आणि गनिमी काव्याने गडावर आल्याचा आनंद घेवू लागले. 

शनिवार..रविवार हे येथील पर्यटनाचे दिवस.. त्यातच जून महिन्याची अखेर म्हणजे निसर्गात रममान होण्याचे दिवस..पावसात भिजण्याचे.. माळावर साठलेल्या पाण्यात एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत लहानपणच्या स्मृती जागवण्याचे दिवस.. पण कोरोनोने या आनंदावर पाणी फिरवलेय..तब्बल तीन महिने पन्हाळा पर्यटकांना बंद राहिलाय..

लॉकडाउनमध्ये थोडीफार सूट मिळाल्याने घरी बसून कंटाळलेल्या लोकानी पन्हाळा खुला असेल आणि तिथे एक दिवस मस्त एंजॉय करू असे ठरवत पन्हाळगडी यायला सुरवात केलीय, पण प्रशासनाने अद्याप सुरक्षेच्या कारणास्तव पन्हाळा बंदच ठेवल्याने त्यांचा हिरमोड होतोय.. येथील नाक्‍यावर तीन पाळयात प्रत्येकी दोन कर्मचारी डयुटीवर असल्याने त्यांना पर्यटकांच्या शिव्या खाण्याची वेळ येतीय. त्यातच एखाद्या पदाधिकाऱ्याचा याला सोडा, त्याला सोडा असा फोन येत असल्याने, त्याना का सोडले ? मग आम्ही का नाही ?अशा प्रश्‍नांना तोंड देण्याची वेळ आली आहे. 

हॉटेलवाल्यांना सुगीचे दिवस... 
पन्हाळा बंद असल्याने गडाभोवतालच्या हॉटेलवाले, बंगलेवाले यांना सुगीचे दिवस आले आहेत. फोन करून गडावरील जेवणाची पार्सल देणाऱ्यांना ऑर्डर द्यायची आणि गडाखालीच थांबायचे हे प्रकार वाढू लागल्याने तहसीलदारांनी लोकांच्या तक्रारीवरून अशा सेवा देणाऱ्या हॉटेल, लॉजवाल्यांना नोटीसा बजावल्या आहेत. 

दृष्टिक्षेप 
- गेली तीन महिने पन्हाळा पर्यटकांसाठी बंदच 
- योग दिनी पन्हाळ्यावर प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न 
- प्रवासी कर नाक्‍यावर कर्मचाऱ्यांकडून पुढे प्रवेशास मज्जाव 
- वादावादीचेही घडताहेत प्रकार 

कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com