esakal | अरेच्च्या ! दोन रुपयांत थिएटरला सिनेमा
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur three old theater special story

त्याकाळी तिकीटदर सामान्य माणसाला परवडणारे नव्हते

अरेच्च्या ! दोन रुपयांत थिएटरला सिनेमा

sakal_logo
By
स्नेहल कदम

कोल्हापूर : सिनेसृष्टीत कोल्हापूरचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. त्याचं कारणही तसचं आहे. मुंबई, हैदराबाद ही शहरे चित्रपट सृष्टीसाठी महत्वाची असली तरी याची सुरुवात कोल्हापूरपासून झाली. कलेचं माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापुरात छत्रपती राजाराम महाराजांनी जयप्रभा स्टुडिओची स्थापना केली. शिवाय पहिल्या भारतीय बनावटीच्या कॅमेराचा शोधही कोल्हापूरमध्ये बाबुराव पेंटर यांनी लावला. त्यावेळी नाटक, चित्रपट यांच्या माध्यमातून संस्कृतीचे दर्शन होत असे आणि पुढे हे लोकांचे मनोरंजनाचे साधन झाले. 

एकोणीशेच्या दरम्यान कोल्हापुरात विविध चित्रपटगृहे उदयास आली. यामध्ये व्हिनस, पार्वती, उमा, बसंत बहार, राजाराम, उषा अशी अग्रणी चित्रपटगृहे प्रकाश झोतात होती. मात्र त्यावेळी यांचे तिकीटदर सामान्य माणसाला परवडणारे न्हवते. यातूनच कसबा बावडा परिसरात चार तरुणांनी लहान चित्रपटगृहांची निर्मिती केली. 

हेही वाचा - Good News :  आयटीआय ऑनलाइन फॅार्म भरण्यास मिळाली मुदतवाढ जाणून घ्या अंतिम तारीख..

1983 साली पहिल्यांदा लियाकत मोमीन यांनी 'समोलिया' या  छोट्या चित्रपटगृहाचा नारळ फोडला. पाठोपाठ 1984 साली सुभाष पाटील यांनी 'वंदना व्हिडिओ सेंटरची' सुरुवात केली. त्याकाळी या परिसरात नव्यानं उदयास येत असलेल्या शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांच्यासाठी ही पर्वणी ठरली होती. या चित्रपटगृहात एकाच वेळी साधारण 40 लोक बसत होते. 

त्यानंतर 1985 मध्ये बाळासाहेब पाटील यांनी गोपी स्कोप आणि 1987 मध्ये सचिन पाटील यांनी डिलक्स व्हिडिओ सेंटर या नावाने मोठ्या पडद्यावर चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. यामध्ये मात्र लोकांची आसनक्षमता 80 पेक्षा जास्त होती. त्याकाळी परिसरात विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी आणि नागरिक मराठी, हिंदी चित्रपट तसेच रामायण, महाभारत या कार्यक्रमांचा आनंद घेत होते. 

हेही वाचा - पोलिसांवरचा ताण वाढताच... 

इंटेल कंपनीचे मशीन, व्हीसिआर आणि रीबनचे कॅसेट अशी या चित्रपटगृहाची साधन होती. त्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीने याची सुरुवात झाली होती. साधारण दोन रुपये प्रती व्यक्ति असा तिकिटाचा दर होता. मात्र त्यावेळी मनोरंजनाच्या साधनांचा अभाव असल्याने लोक या मिनीचित्रपटगृहांना पसंदी देत होते. परिसरातील शेतकरी आणि कामगार वर्ग यांच्या मनोरंजनासाठी अगदी अल्प दरात चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. या चित्रपटगृहांविषयी लोक अजूनही आपल्या आठवणी जागवतात. 

दिवाळी, दसरा किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी महिलावर्गाचे चित्रपट पाहण्याचे नियोजन असायचे. व्हीसिआरच्या सहाय्याने त्यावेळी या तरुणांनी  नव्या संकल्पनेतून लोकांच्या मनोरंजनाला पर्याय उपलब्ध करून दिला होता. 

कालांतराने प्रत्येकाच्या घरी टीव्ही आला आणि एकत्र बसून चित्रपट पाहण्याचे प्रमाण कमी झाले. लोकांकडे मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध होत गेली आणि या चित्रपटगृहांनी काळाच्या ओघात विश्रांती घेतली.

go to top