अवघडच... 'या' परिसरात गायी, म्हशी आणि शेळ्यांही नाहीत सुरक्षित... !

अशोक पाटील
Tuesday, 14 July 2020

गोठ्यातूनच जनावरांची चोरी होऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः गावाबाहेर असलेले गोठे चोरट्यांनी लक्ष केले आहेत. कोवाड परिसरातील एकाही जनावरांच्या चोरीचा अद्याप छडा लागला नाही.

कोवाड : गोठ्यातूनच जनावरांची चोरी होऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः गावाबाहेर असलेले गोठे चोरट्यांनी लक्ष केले आहेत. कोवाड परिसरातील एकाही जनावरांच्या चोरीचा अद्याप छडा लागला नाही. पुन्हा शुक्रवारी दुंडगे येथून गोठ्यातील सर्वच दुभती जनावरे चोरीला गेल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. 

शुक्रवारी रात्री दुंडगे येथील संग्राम देसाई यांच्या गोठ्यातून दोन गायी व एक म्हैस चोरीला गेली. परिसरात शोध घेऊनही जनावरे मिळाली नाहीत. चार महिन्यांपूर्वी निट्टूर पाझर तलावाजवळून अनिल फडके या शेतकऱ्याच्या बकऱ्याच्या शेडमधून सर्वच 23 बकरी चोरीला गेली. त्यानंतर फडके यांनी तब्बल महिनाभर कर्नाटक व महाराष्ट्रातील मोठ्या बाजारात जाऊन बकऱ्यांचा शोध घेतला, पण यश मिळाले नाही. अखेर पुन्हा कर्ज काढून नवीन बकरी घेतली. दीड वर्षापूर्वीही त्यांची पाच बकरी चोरीला गेली होती.

दोन वर्षांपूर्वी तेऊरवाडी येथून म्हैस चोरीला गेली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चोरट्यांनी गावाबाहेर असलेले गोठे लक्ष केले आहेत. देसाई यांचा गावाबाहेर बसवेश्‍वर मंदिराजवळ जनावरांचा गोठा आहे. त्यामुळे चोरट्यांनी आजूबाजूचा अंदाज घेऊन गोठ्यातील सर्वच जनावरे चोरून नेली.

अवघ्या चार महिन्यांत कोवाड परिसरात या दोन मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे गावाबाहेर जनावरांचे गोठे असलेले शेतकरी चिंतेत आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी बकरी, गायी, म्हशींचे पालन करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. जागेची अडचण भासणारे शेतकरी आपल्या जवळच्या शेतात गोठा बांधून जनावरे पाळत आहेत, पण जनावरांच्या चोरीच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

आतापर्यंत झालेल्या चोरीच्या घटनांचा अद्याप उलघडा झाला नसल्याने शेतकऱ्यांना जनावरांची काळजी लागली आहे. त्यासाठी पोलिसांनी दुंडगे येथील जनावरांच्या चोरीचा छडा लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In The Kowad Area Animal Theft Is Happening Kolhapur Marathi News