esakal | कोवाड-बेळगाव मार्ग अद्याप बंदच
sakal

बोलून बातमी शोधा

Kowad-Belgaum Road Is Still Closed Kolhapur Marathi News

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक व महाराष्ट्र हद्दीवरील चंदगड तालुक्‍याच्या पूर्व भागातील कोवाड ते बेळगाव हा मार्ग बंद असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून सीमा भागातील लोक अडचणीत सापडले आहेत.

कोवाड-बेळगाव मार्ग अद्याप बंदच

sakal_logo
By
अशोक पाटील

कोवाड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक व महाराष्ट्र हद्दीवरील चंदगड तालुक्‍याच्या पूर्व भागातील कोवाड ते बेळगाव हा मार्ग बंद असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून सीमा भागातील लोक अडचणीत सापडले आहेत.

विशेषतः येथील आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. चंदगडचे आमदार राजेश पाटील व बेळगावचे आमदार ऍड. अनिल बेनके यांनी रुग्णवाहिकांची अडवणूक करू नका, अशा सूचना प्रशासनाला केल्या असतानाही होसूर घाटात रस्त्यावर मातीचा बांध घालून रस्ता अडविला असल्याने रुग्णांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. हा मातीचा बांध बाजूला करून रुग्णवाहिकेला रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी होत आहे. 

चंदगड व गडहिंग्लज तालुक्‍याच्या सीमेवरील गावांचा बेळगावशी संपर्क आहे. कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दोन्ही राज्यांनी सीमा बंद केल्या आहेत. शिनोळी, दड्डी व होसूर या मुख्य रस्त्यावरून तपासणी नाके उभे केले आहेत. मातीचे बांध घालून व झाडे तोडून रस्त्यावर टाकली आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांतील वाहतूक पूर्णत: बंद आहे. सध्या तालुक्‍यातील रुग्णांना गडहिंग्लज किंवा कोल्हापूरला जावे लागत आहे. यामध्ये रुग्णांना नवीन डॉक्‍टरांकडे पुन्हा नव्याने ट्रीटमेंट सुरू करावी लागत आहे.

गरोदर महिला व गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांचे यात हाल होत आहेत. आर्थिक भुर्दंडही सहन करण्याची वेळ आली आहे. तालुक्‍यातील लोकांनी या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले असता बेळगावचे आमदार ऍड. अनिल बेनके यांनी शिनोळी तपासणी नाक्‍यावर येऊन रुग्णवाहिका सोडण्याची विनंती केल्यानंतर शिनोळीतील रस्ता खुला केला आहे, पण होसूर घाटातील रस्ता अजून सुरू केला नाही. आमदार राजेश पाटील यांनी हा मार्ग खुला करण्याबाबत प्रशासनाकडे मागणी केली आहे. दोन्ही राज्यांच्या प्रशासनाकडून आरोग्य सेवेसाठी रस्ते अडविले नसल्याचा निर्वाळा दिला जात असला तरी मातीचे बांध घालून अडवलेले रस्ते जोपर्यंत खुले होत नाहीत. तोपर्यंत रुग्णवाहिका जाऊ शकत नाहीत. 

रुग्णांचे हाल
कोवाड ते बेळगाव व चंदगड ते बेळगाव हे दोन्ही रस्ते तालुक्‍यातील वाहतुकीच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे रस्ते बंद असल्याने चंदगड तालुक्‍यातील रुग्णांचे हाल होत आहेत. आरोग्य सेवेच्यादृष्टीने बेळगाव जवळचे असल्याने या दोन्ही मार्गावरून रुग्णवाहिका व रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना सोडण्याची गरज आहे. 
- जनार्दन देसाई, माजी उपसरपंच, कागणी. 

go to top