कोल्हापुरातील फुटबॉल हंगामासाठी केएसएची अशी आहे रणनीती

संदीप खांडेकर
Tuesday, 15 September 2020

कोल्हापूर : कोरोनाचा कहर पाहता कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनसमोर (केएसए) आव्हानांचा डोंगर उभा आहे. विदेशात फुटबॉल स्पर्धांचा नारळ फुटला असला तरी कोल्हापुरातील हंगामाला डिसेंबरपूर्वी सुरवात होण्याची शक्‍यता धूसर दिसत आहे. प्रत्येक फुटबॉलपटूची कोरोना टेस्ट घेऊन मैदानावर उतरायचे तर त्याच्या खर्चाचे गणित कसे सोडवायचे, असा प्रश्‍न आहे. सरकारी नियमांचा आधार घेऊन हंगाम सुरू करायचा झाल्यास पुढील हंगाम तोट्यातला असणार हे उघड आहे. त्यामुळे केएसएने संघ व्यवस्थापनाच्या सूचना लक्षात घेऊन हंगाम सुरू करण्याची रणनीती आखली आहे. 
 
विदेशातील स्टार फुटबॉलपटू कोरोना बाधित आढळले आहेत. नियमांच्या चौकटीत तेथे फुटबॉल स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. कोल्हापुरातल्या हंगामाची तितकीच उत्सुकता फुटबॉलप्रेमींना आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येने हंगाम कधी सुरू होईल, याचे आडाखे बांधले जात आहेत. विदेशातील फुटबॉलला मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत इथल्या फुटबॉलपटूंच्या हाती फारसे मानधन मिळत नाही. संघाच्या अस्मितेसाठी खेळणाऱ्या खेळाडूंची येथे कमतरता नाही. त्यामुळे हंगाम सुरू केल्यानंतर खेळाडू कोरोनाबाधित आढळले तर त्याची जबाबदारी कोणावर, असा प्रश्‍न तयार झाला आहे. 
एखाद्या संघाचा वार्षीक आर्थिक खर्च विचारात घेतला तर तो लाखांत जातो. स्पर्धांची संख्या व बक्षीसांची रक्कम पाहता संघांना त्यातून फारशी रक्कमही हाती मिळत नाही. तोट्यातच काही संघ अस्तित्त्व टिकविण्याच्या प्रयत्नात आहेत. या स्थितीत प्रत्येक खेळाडूची कोरोना टेस्ट घेऊन त्यांना मैदानावर उतरण्यास मान्यता द्यावी, तर तो खर्च करणे संघांना परवडणारे नाही. परिणामी हंगाम सुरू करायचा झाल्यास संघ व्यवस्थापनाचे मुद्दे विचारात घेऊन पुढील पावले टाकण्याचा केएसएचा विचार आहे. त्याकरिता सर्व संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत केएसए लवकरच बैठक घेणार आहे. 

विदेशातील खेळाडूंचा सराव जोरदार असतो. त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही अधिक असते. असे असतानाही त्यांना कोरोनाने विळखा घातला. ती स्थिती कोल्हापुरात उद्‌भवू शकते. त्यामुळे हंगाम सुरू करण्यापूर्वी खेळाडूंच्या जीवाचा विचार करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहोत. 
- प्रा. अमर सासने, सरचिटणीस, केएसए.

संपादन ः यशवंत केसरकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is KSA's strategy for the football season in Kolhapur