कुरुंदवाड पालिकेत आघाडीत बिघाडी

अनिल केरीपाळे | Tuesday, 1 December 2020

कुरुंदवाड येथील पालिकेच्या राजकारणाला फुटीचा शाप आहे. सत्तेसाठी अभद्र युती, आघाडी करुन ऐनवेळी दगा देण्याचा खेळ येथे वर्षानुवर्षे खेळला गेला आहे. यंदा त्यास छेद जाईल असे वाटत असतानाच चार वर्षात सुखाने नांदणाऱ्या कॉंग्रेस -राष्ट्रवादी आघाडीतील राजकारण व नाराजीनाट्याने उचल खाल्ली.

कुरुंदवाड : येथील पालिकेच्या राजकारणाला फुटीचा शाप आहे. सत्तेसाठी अभद्र युती, आघाडी करुन ऐनवेळी दगा देण्याचा खेळ येथे वर्षानुवर्षे खेळला गेला आहे. यंदा त्यास छेद जाईल असे वाटत असतानाच चार वर्षात सुखाने नांदणाऱ्या कॉंग्रेस -राष्ट्रवादी आघाडीतील राजकारण व नाराजीनाट्याने उचल खाल्ली. आघाडीत बिघाडी होत इतिहासाची पुनरावृत्ती झाली. या घडामोडीत कॉंग्रेस बॅकफूटवर गेली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला निधीचे टॉनिक मिळाले. त्यांची सोबत करणाऱ्या विरोधी भाजपला सत्तेची संजीवनी मिळाली आहे. या घडामोडी कॉंग्रेसला आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या आहेत. वर्षभरात पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका असून त्यासाठीची बेरीज वजाबाकी आतापासूनच सुरु झाल्याचे चित्र आहे. 

पालिकेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी भाजप यांनी स्वतंत्र निवडणूका लढवल्या. थेट नगराध्यक्ष पदावर जयराम पाटील यांनी इतिहास घडवत विजय मिळवला. सत्तेचा हातातोंडाशी आलेला भाजपचा घास हिरावला. कॉंग्रेस राष्ट्रवादीची आघाडी सत्तेवर आली. पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत पदांच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित झाला. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी सत्तेत आली पदांच्या वाटपाचा फॉर्म्युल्याने भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. 

शहराचा चेहरामोहरा बदलवण्याचे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या सत्तारुढ आघाडीला विकासकामाच्या पातळीवर अपयश आले आहे, असेच म्हणावे लागेल असे चित्र आहे. चार साडेचार वर्षात 14 कोटींच्या महत्वाकांक्षी सुधारित नळपाणीपुरवठा योजनेचे केवळ 15 ते 20 टक्केच काम झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या मोठ्या कामांबरोबरच अनेक छोटी मोठी कामेही रखडली आहेत. पद, समित्या व स्वीकृतचे वाटप वगळता उठावदार असे कोणतेही काम दिसत नाही. नगराध्यक्ष जयराम पाटील आता वयमानपरत्वे थकलेले असून त्यांचे चिरंजीव विजय पाटील यांचा एकूण निर्णयप्रक्रियेत समावेश आहे. त्यांचा वाढता हस्तक्षेप नगरसेवकांना खटकत होता.

Advertising
Advertising

त्यातच सर्वांशी सुसंवाद राखण्यात विजय पाटील कमी पडल्यामुळे विसंवाद वाढला व पर्यायाने राष्ट्रवादीमधील नगरसेवकांनी फारकत घेण्याची तयारी केली. सत्तारूढ आघाडीत बेबनाव वाढेल व आपल्याला चाल करायची संधी मिळेल अशी अटकळ बांधून बसलेले मुरब्बी राजकारणी रामचंद्र डांगे यांनी घात साधला. सत्तेत राहण्यासाठी करायला लागणारे सारे खटाटोप डांगे करतात. पक्षीय अभिनिवेश न पाहता धाडसाने राजकारण करतात. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्याशी असलेला संघर्ष बाजूला ठेवत त्यांनी नमती भूमिका घेतली.

जोडण्या लावण्यात यश मिळवले. शहर कृती समितीच्या नावाने भाजप, राष्ट्रवादी व कॉंग्रेस असे वेगळे समीकरण तयार करुन ताकद दाखवली. मंत्री यड्रावकरांची जयसिंगपूर, शिरोळ पालिकेवर सत्ता आहे. कुरुंदवाडमधील सत्तेत ते वाटेकरी असले तरी दुय्यम भूमिकेत आहेत. त्यांनाही गटाचा विस्तार करण्यासाठी पालिकेत सत्ता हवी होती. त्यामुळेच एक मंत्री व मतदारसंघाचा अपक्ष आमदार म्हणून विकासकामाचा हक्क दाखवत निधीचे आश्वासन देत जनतेचीही सहानुभूती मिळविली.

या सर्व घडामोडीत व आरोपाच्या धुरळ्यात कॉंग्रेसकडून उत्तर देण्यासाठी ना नगराध्यक्ष जयराम पाटील पुढे आले, ना विजय पाटील, ना कुणी नगरसेवक त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था वाढली. पालकमंत्री सतेज पाटील यांचे भरभक्कम पाठबळ पाठीशी असतानाही आघाडीतील नगरसेवकांना सांभाळता येत नाहीत. शहराच्या विकासासाठी निधी आणता आला नाही. तसेच प्रलंबित प्रश्न सोडवता आले नाहीत अशी प्रतिमा ठळक झाली. त्यामुळे कॉंग्रेस बॅकफूटवर आली आहे. 

भाजप नगरसेवकांना संजीवनी 
राष्ट्रवादीच्या नाराज नगरसेवकांना मंत्री यड्रावकरांचे थेट बळ मिळाले. कारभारात वाटा मिळाला तर चार वर्षापासून विरोधात बसलेल्या भाजप नगरसेवकांना तूर्ततरी सत्तेची संजीवनी मिळाली हे मात्र नक्की. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur