कामगार पैलवानांनी दिली विजयी सलामी 

Labor Wrestling Tournament in kolhapur
Labor Wrestling Tournament in kolhapur

कोल्हापूर - एरव्ही कारखान्यात, दुकानात किंवा एखाद्या व्यवसायात दिवस रात्रीच्या शिप्टमध्ये राबणारे हात आज कुस्तीच्या निमित्ताने एकामेकांना भिडले. अवघ्या काही क्षणात प्रतिस्पर्ध्यांवर वीजेच्या चपळाईने झेप घेत त्याला अस्मान दाखवले. राजर्षी शाहू खासबाग मैदानात कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अशा जवळपास 75 हून अधिक रंगदार कुस्त्यांनी कामगार कल्याण मंडळाच्या "कामगार केसरी' व "कुमार केसरी' राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा पहिला दिवस गाजविला. 

एरव्ही कामगार म्हणून कुठे तरी काम करीत असलेल्या कामगारांनी कुस्तीचा छंद जोपासला अशा राज्यातील कामगार पैलवानांच्या लक्षवेधी सहभागाने कामगार कल्याण केंद्राच्या कुस्ती स्पर्धेला सुरवात झाली. खासदार संभाजीराजे छत्रपती, महापौर निलोफर आजरेकर, हिंद केसरी दिनानाथ सिंह, गोकुळ दुध संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, कामगार कल्यान आयुक्त महेंद्र तायडे, कामगार कल्यानसह आयुक्त घनःश्‍याम कुळधणे, कामगार कल्यान अधिकारी राजेंद्र शिंगाडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत याकुस्ती स्पर्धेला सुरवात झाली. 

खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते लावलेली पहिली कुस्तीत सौरभ मुसळे व रणजीत पवार यांच्यात झाली. 

हलगीच्या कडाकडात कुस्ती सौरभ व रणजीत यांच्यात सुरवातीला खडाखडी रंगली, एकमेकांची ताकद आजमावतानाच पवार याने सौरभला ढाक लावली. अवघ्या क्षणात सौरभ त्यातून निसटला तशी कुस्तीतील रंगत वाढत गेली. अखेर गुणांवर रणजीत पवार विजयी झाला. येथेच कामगार केसरी स्पर्धेची विजयी सलामी झाली. 

त्यानंतर 65 किलोपासून ते 20 किलोपर्यंतच्या वजनी गटातील पहिल्या सत्रातील 75 कुस्त्या रात्री उशिरापर्यंत रंगत गेल्या. यानंतरच्या दोन कुस्त्यात अनिल चव्हाण विरूध्द रणजीत खांडेकर यांच्यात चव्हाण विजयी ठरले. अमरसिंह पाटील व मारूती माने यांच्यातील कुस्तीत पाटील विजयी ठरले. 
खासदार संभाजीराजे म्हणाले, ""कामगाराना प्रोत्साहन देण्यासाठी भरविलेल्या कुस्ती स्पर्धेमुळे कुस्ती परंपरा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. कामगार कल्याण ंमंडळ कामगारांच्या हितासाठी 85 कोटी रूपयांचा निधी वापरते, यात कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासोबत मुलांमध्ये क्रीडा गुण विकसीत होण्यासाठी मंडळामार्फत राबविले जाणारे उपक्रम कौतुकस्पद आहेत.'' 

आज रंगणार मानाच्या कुस्त्या 
औरंगाबाद, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर, अमरावती आदी भागातील 154 पैलवानांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. खासगी कारखाने, दुकानात काम करणारा बहुतांशी कष्ठकरी वर्ग आहे. त्यांनी रोजच्या कामासोबत क्रीडा गुणही जोपासवेत यासाठी कामगार कल्याण मंडळाने कुस्ती स्पर्धा भरविल्या आहेत. यात 75 हजार रूपयांची "कामगार केसरी' व "कुमार केसरी' अशा दोन्ही मानच्या कुस्त्या उद्या बुधवारी (ता.26) होणार आहेत. त्याची पहिली फेरी आज झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com