इचलकरंजीत कोरोना चाचणीचा ताळमेळ बसेना 

ऋषीकेश राऊत
Wednesday, 25 November 2020

शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांना बंधनकारक केलेल्या कोरोना चाचणीचा ताळमेळ अद्याप लागत नसल्याचे चित्र आहे. रुग्णालयातील कोरोना चाचणी किटच्या कमतरतेचा परिणाम शाळा सुरू होण्यावर होत आहे.

इचलकरंजी : शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांना बंधनकारक केलेल्या कोरोना चाचणीचा ताळमेळ अद्याप लागत नसल्याचे चित्र आहे. रुग्णालयातील कोरोना चाचणी किटच्या कमतरतेचा परिणाम शाळा सुरू होण्यावर होत आहे. आयजीएम रुग्णालयात कोरोना चाचणी किट उपलब्ध नसल्यामुळे मंगळवारी सुमारे 80 शिक्षकांना परत जावे लागले. शिक्षण विभागाने अचूक नियोजन केले तरी आरोग्य विभागाने किट उपलब्ध करणे गरजेचे आहे. 

हातकणंगले तालुक्‍यातील सुमारे 3 हजार 505 शैक्षणिक स्टाफसाठी तीन ठिकाणी स्त्राव तपासण्याची सोय केली. संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे, आयजीएम रुग्णालय इचलकरंजी व ग्रामीण रुग्णालय पारगाव येथे स्त्राव तपासण्याची सोय केली. ग्रामीण रुग्णालय पारगाव येथे सुविधा व किटअभावी तपासणे बंद आहे. मंगळवारपासून आयजीएम रुग्णालय व संजय घोडावत विद्यापीठ येथे परिपूर्ण नियोजन करून तपासणी सुरू केली आहे. आयजीएम आणि संजय घोडावतमध्ये प्रत्येकी 150 याप्रमाणे 300 शिक्षकांची दररोज तपासणी करण्याचे नियोजन केले, मात्र आयजीएम रुग्णालयात उपलब्ध किटनुसार केवळ 70 शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आणि अन्य शिक्षक चाचणीविना परतले. 

कोरोना चाचणी किटच्या कमतरतेमुळे शाळा सुरू होण्यास नवीन वर्ष उजाडण्याची स्थिती आहे. त्यामुळे वेळेत शिक्षकांची स्त्राव तपासणी झाली नाही तर याचा परिणाम शाळा सुरू करण्यावर होऊ शकतो. संजय घोडवत विद्यापीठात सुरळीतपणे स्त्राव तपासणी सुरू आहे, मात्र आयजीएम रुग्णालयातील गोंधळ टाळून अपेक्षित किट उपलब्ध करून तपासणी होणे आवश्‍यक आहे. 

सावर्डे केंद्रात कोरोना चाचणी 
तालुक्‍यातील शैक्षणिक स्टाफची संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाने सावर्डे आरोग्य केंद्रात कोरोना चाचणीस हिरवा कंदील दाखवला आहे. येथे योग्य नियोजन करून स्त्राव तपासणी होणार आहे. आयजीएम व संजय घोडावत विद्यापीठ या ठिकाणी कोरोना चाचणी किटची संख्याही वाढवली जाणार आहे. 

कोरोना चाचणी स्थिती 
एकूण शैक्षणिक स्टाफ - 3 हजार 505 
कोरोना चाचणी झालेले - 893 
कोरोना बाधित - 0 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack Of Corona Test Kit In Ichalkaranji Kolhapur Marathi News