पावसाची दडी, त्यात किडींची उडी

Leaf-Eating Insects Attack Soyabeans Crop Kolhapur Marathi News
Leaf-Eating Insects Attack Soyabeans Crop Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : सोयाबीन उत्पादकांना यंदाचा खरीप हंगाम सायवळ आहे की नाही याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. पहिल्यांदा सोयाबीनच्या उगवणीवर परिणाम, त्यानंतर पावसाची दडी आणि आता उगवलेल्या सोयाबीनवर पाने खाणाऱ्या किडींनी (अळी) हल्ला चढवायला सुरूवात केली आहे. सलग आठ दिवसाच्या कोरड्या हवामानामुळे या किडी वाढल्या असून सोयाबीनचा फडशा पाडत आहेत. शेतकऱ्यांनी तत्काळ औषधांची फवारणी करण्याची गरज आहे. या किडीला वेळीच पायबंद नाही घातला, तर सोयाबीनचे कोवळे पीक फस्त होण्याचा धोका आहे. 

एक जूनपासून तीन दिवस चांगला पाऊस झाला. यामुळे आनंदलेल्या शेतकऱ्यांनी भातासह सोयाबीनचीही पेरणी केली. हा पाऊस चक्रीवादळाचा होता. पेरणीच्या हंगामातच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. काहींनी घात नसल्याने पावसानंतर एक-दोन दिवसांनी सोयाबीन पेरले. आठवडा उलटल्यानंतर सोयाबीनला अंकूर फुटल्याचे दिसत नसल्याने शेतकरी धास्तावला. कृषी विभागाची दारे ठोठावली. कृषी खात्याचे उत्तर येईपर्यंत शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसुद्धा केली. मॉन्सूनच्या आगमनानंतर मुसळधार पाऊस झाला. सोयाबीनची उगवण चांगली झाल्याने शेतकरी आनंदला. 

दरम्यान, मॉन्सूनच्या दोन दिवसाच्या मुसळधार पावसानंतर पुन्हा उघडीप मिळाली. पावसामुळे तरारून उगवलेले सोयाबीन, भात, भुईमूग आदी पिकांतील आंतरमशागतीसाठी शेतकरी धडपडू लागला. भांगलण, कोळपणीही झाल्या. परंतु पावसाचा अजून पत्ता नाही. परिणामी, सोयाबीनची पाने खाणाऱ्या अळींनी कोरड्या हवामानाची संधी साधली. पाऊस नसल्याने या किडींचा प्रादुर्भाव यंदा लवकर झाल्याचे सांगण्यात येते. पिकासाठी आणि किडी धुवून जाण्यासाठी आता पावसाची नितांत गरज आहे. शेतकरी ढगांकडे डोळे लावून बसला आहे. परंतु, पदरी निराशाच येत असल्याने तो घाईला आला आहे. 

खर्चात भर... 
गडहिंग्लज तालुक्‍यात 13 ते 14 हजार हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी झाली. कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या या पिकाकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांत दरवर्षीच भर पडत आहे. यंदा पहिल्या टप्प्यातील पेरणी केलेल्या सोयाबीनची उगवण झाली नाही. यामुळे दुबार पेरणीच्या खर्चातून शेतकरी बाहेर पडतो न पडतो तोच आता पाने खाणाऱ्या अळींमुळे औषध फवारावे लागणार आहे. दुबार पेरणीच्या खर्चात आता या औषधांच्या खर्चाची भर पडली आहे. 

कसे मिळवावे नियंत्रण 
पाने खाणाऱ्या अळींची अवस्था पहिल्या टप्प्यात आहे. सोयाबीनची पानेही अजून कोवळी आहेत. कडक ऊन आणि हिरवीगार पाने हे वातावरण या अळींना पोषक आहे. शेतकऱ्यांनी त्याच्या नियंत्रणासाठी क्‍लोरोपायरीफॉस किंवा क्‍युनॉलफॉस 25 मिली औषध 15 लिटर पाण्यातून फवारण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. नंदकुमार कदम यांनी केले आहे. अधून-मधून भुरभूर पाऊस असेल तर स्टिकर वापरावे अन्यथा कडक उन्हात त्याची गरज नसल्याचेही सांगितले. 

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com