
पार्ले धनगरवाडा (ता. चंदगड) येथे मालकी हद्दीत चरणाऱ्या रेडकावर व गायीवर बिबट्याने हल्ला केला.
चंदगड : पार्ले धनगरवाडा (ता. चंदगड) येथे मालकी हद्दीत चरणाऱ्या रेडकावर व गायीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात ही जनावरे जखमी झाली. ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्या जंगलात पळून गेला. सोमवारी (ता. 18) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
बिबट्याने मालकी हद्दीत चरणाऱ्या जनावरांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये धुळू बमु फोंडे यांचे दोन वर्षाचे रेडकू, तर पोलिस पाटील सखाराम फोंडे यांची गाय जखमी झाली. बिबट्याच्या हल्यामुळे बिथरलेली जनावरे पाहून फोंडे यांच्या आईने आरडाओरड केल्याने बिबट्या जंगलात पळून गेला.
वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल बी. आर. भांडकोळी, वनरक्षक गणेश बोगरे, वनमजूर तुकाराम गुरव, चंद्रकांत बांदेकर, अर्जून पाटील, विश्वनाथ नार्वेकर यांनी धनगरवाड्यावर जाऊन जखमी जनावरांची पाहणी केली. वनानजीकच्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात बांद्राई धनगरवाड्यावर बिबट्याच्या हल्यात म्हैस जखमी झाली आहे. वाळलेले गवत आणि कठीण जमीन यामुळे त्याच्या पायाचे ठसे आढळले नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
संपादन - सचिन चराटी
kolhapur