गडहिंग्लज तालुक्‍यात जोर ओसरला, पण पूरस्थिती कायम, पाच कुटुंबांचे स्थलांतर...

Less Rainfall In Gadhinglaj Taluka Kolhapur Marathi News
Less Rainfall In Gadhinglaj Taluka Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : दोन दिवस मुसळधार पडलेल्या पावसाने आज थोडी विश्रांती घेतली. त्याचा जोर ओसरला होता. तीन-चार तुरळक सरी वगळता दिवसभर उघडीप दिली. पण, आजरा, आंबोली परिसरात पाऊस असल्याने पाण्याखाली गेलेल्या तालुक्‍यातील सातही बंधाऱ्यांची स्थिती जैसे-थे होती. हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पूल पाण्याखालीच असल्याने गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्ग सलग दुसऱ्या दिवशी बंदच राहिला. 

मंगळवारपासून (ता.4) पावसाचा जोर चांगलाच वाढला. भडगाव पुलावर पाणी आल्यामुळे गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला. पर्यायी मार्ग असणाऱ्या गजरगाव बंधाऱ्यावरही बुधवारी (ता.5) सायंकाळी पाणी आल्यामुळे पूर्ण संपर्क तुटला, तर ऐनापूर, गिजवणे, हरळी, जरळी, निलजी, नांगनूर, कानडेवाडी हे सातही बंधारे पाण्याखाली गेले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीही ठप्प होती. 

दरम्यान, आज पावसाचा जोर ओसरला होता. सकाळी तुरळक सरी कोसळल्यानंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले. दिवसभरात दोन-तीन वेळा तुरळक सरी कोसळल्या. अन्यथा दिवसभर वातावरणही स्वच्छ होते. उन्ह-पावसाचा खेळ सुरू होता. पण, आजरा-आंबोली परिसरात पाऊस कमी झालेला नाही. त्यामुळे हिरण्यकेशीची पातळी फारशी कमी झालेली नाही. परिणामी, भडगाव पुलासह सातही बंधारे आज पाण्याखालीच होते. सकाळी वाढलेली पाण्याची पातळी सायंकाळी थोडी कमी झाली होती. 

नदीवेशीत आले पाणी... 
शहरातील नदीवेस परिसरातील कृत्रिम कुंडापर्यंत बुधवारी (ता.5) सकाळी पाणी आले होते. आज सकाळी मारुती मंदिर आणि पारकट्टा ओलांडून पाणी नदीवेशीत आले. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, दिवसभर पाण्याच्या पातळीत फारशी वाढ न झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. 

पाच कुटुंबांचे स्थलांतर... 
शहरातील नदीवेस भागात आज सकाळी पाणी आले. काही घराजवळ पाणी आल्यामुळे पालिकेने त्या कुटुंबांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. पाच कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. स्थलांतरित झालेल्या लोकांची संख्या 20 आहे. काही जण भाड्याच्या घरात तर काही जण आपल्याच पर्यायी घरामध्ये स्थलांतरित झाले आहेत. पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी घरातील साहित्य हलविले.

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com