
ध्वनीक्षेपक लावतानाही रात्री 12 पर्यंत आणि ध्वनीमर्यादेचे सर्व नियम पाळूनच लावावे लागतील.
कोल्हापूर : जिल्ह्यात गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम, ख्रिसमसह इतर कार्यक्रमामध्ये केवळ पंधरा दिवसच ध्वनीक्षेपक लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही ध्वनीक्षेपक लावतानाही रात्री 12 पर्यंत आणि ध्वनीमर्यादेचे सर्व नियम पाळूनच लावावे लागतील. ज्यांना ध्वनीक्षेपक लावायची आहेत, त्यांनी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिले आहेत.
श्री गलांडे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपक लावताना श्रोतगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी फक्त ध्वनीची मर्यादा राखणे बंधनकारक आहे. तसेच, पोलीसांच्या पूर्वपरवानगीशिवाय ध्वनीक्षेपक वापरता येणार नाही. ध्वनीक्षेपक सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत जिल्ह्यामध्ये वापरता येणार आहेत. यातही ध्वनी प्रतिबंधीत क्षेत्राच्या परिसरामध्ये कोणतीही सवलत असणार नाही.
हे पण वाचा - भन्नाटच : मतदान केले तरच मिळणार चिकन-मटन
दरम्यान, शिवजयंती (पारंपारिक) -1 दिवस, ईद-ए-मिलाद-1 दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती-1 दिवस, दहीहंडी (गोपाळकाला)- 1 दिवस, मोहरम (दि. 10 ते 19 ऑगस्ट) मोहरम- नववा दिवस (कत्तलरात्र), गणपती उत्सव (दि. 10 ते 19 सप्टेंबर) गणेशोत्सव - 4 दिवस (पाचवा, आठवा, नववा, दहावा दिवस) नवरात्री उत्सक (अष्टमी व नवमी) -2 दिवस, दिपावली (लक्ष्मीपुजन)- 1 दिवस, ख्रिसमस- 1 दिवस, 31 डिसेंबर -1 दिवस, उर्वरित 1 दिवस या कार्यक्रमांना हे नियम लागू असतील. असेही श्री गलांड यांनी नमूद केले आहे.
संपादन - धनाजी सुर्वे