हातकणंगलेत पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांच्यांत चांगलीच जुंपली..का वाचा 

अतुल मंडपे | Tuesday, 14 July 2020

कोणालाही विश्वासांत न घेता परस्परच एकतर्फी निर्णय

हातकणंगले (कोल्हापूर) : आजूबाजूच्या गावांतील  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गुरूवार १६ ते रविवार १९ तारखेपर्यंत हातकणंगले चार दिवस पूर्णतः लॉक डाऊन ठेवण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला आहे. दरम्यान कोणालाही विश्वासांत न घेता परस्परच एकतर्फी निर्णय लादल्याचा आरोप करत व्यापारांनी याला थेट विरोध केला. यावरून पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांच्यांत चांगलीच जुंपली.  

 गेल्या चार महिन्यांत परगावाहून आलेल्या एका परप्रांतीयाचा अपवाद वगळता हातकणंगलेत कोरोनाचा एकही रूग्ण सापडलेला नाही. त्यामुळे काही अंशी सर्वच जण गाफिल असून सोशल डिस्टान्सिंग, मास्क अशा सर्वच उपायांचा फज्जा उडाला आहे. याच वेळी इचलकरंजीसह आजूबाजूची गावे कोरोनाचा हॉट स्पॉट ठरत आहेत. त्यामुळे परत एकदा प्रशासनाची चिंता वाढली आहे.   त्यामुळे या पाश्र्वभूमीवर हातकणंगले चार दिवस लॉक डाऊन करण्याचा निर्णय आज प्रशासनाने घेतला.

हेही वाचा- .तर शासनाला गुडघे टेकायला भाग पाडू ; समरजितसिंह घाटगे

मात्र गेले चार महिने व्यवसायांवर संक्रांत आली असून रोजी रोटीचा ताळमेळ घालताना नाकी नऊ येत आहे. अशातच प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी कोणालाही विश्वासांत न घेता परस्पर निर्णय लादल्याचा आरोप व्यापाऱ्यांतून होत आहे. याचा जाब विचारण्यांसाठी व्यापारी नगरपंचायतीत गेले असता पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्यांत जोरदार बाचाबाची झाली, यावेळी पदाधिकाऱ्यांनी हातवारे करत व्यापाऱ्यांचे म्हणणेही नीट ऐकून घेतले नाही याची चर्चा गावात सुरू आहे...   

संपादन - अर्चना बनगे