लॉकडाऊन मुळे मेंढपाळांच्या भटकंतीलाच 'ब्रेक'...

Lockdown  effects on shepherds wanderings nipani
Lockdown effects on shepherds wanderings nipani

निपाणी - गेल्या महिन्यापासून कोरोनामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. त्यामुळे लॉकडाउनसह विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने गुंता क्लिष्ट होत आहे. त्याचा सर्वांनाच फटका बसत आहे. गावोगावी फिरून मेंढ्यासह स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षी मेंढपाळ आंतरराज्य प्रवास करतात. पण यंदा कोरोनामुळे समस्यांचा पाढा वाढला आहे. परिणामी त्यांच्या भटकंतीलाच आता 'ब्रेक' लागला आहे.

दरवर्षी निपाणी ग्रामीण भागातील अनेक मेंढपाळबांधव चारा-पाण्याच्या शोधात महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातील अनेक जण कर्नाटकात वर्षातून दोन-तीन वेळा स्थलांतरित होतात. त्यामुळे जनावरांच्या चारा-पाण्यासह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी गावासह शेतीवाडीत येण्यास मज्जाव करत आहेत. त्यामुळे मेंढपाळ बांधवांसमोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या एप्रिल अंतिम टप्प्यात असून मे महिन्यात शेतीवाडीमध्ये मशागतीच्या कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे  मेंढ्या चारण्यासाठी वेळप्रसंगी महाराष्ट्रातील हद्दीमध्येही जावे लागते. मात्र शेतकऱ्यांकडून मेंढपाळांना हाकलून लावले जात आहे. शिवाय शेतामध्ये बकरी बसवण्यासाठीही शेतकरी तयार नाहीत. परिणामी उदरनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस  गंभीर बनत आहे. परिसरातील कर्नाटक-महाराष्ट्रात मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे काढून गावच्या वेशी बंद केल्या आहेत. चारा, पाणी उपलब्ध होत नसल्याने मुक्या प्राण्यांचे हाल होत आहेत. त्याकडे शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन योग्य ते सहकार्य करण्याची मागणी मेंढपाळ बांधवातून होत आहे.

माजी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मेंढपाळबांधव नेहमी कर्नाटक-महाराष्ट्रात सर्वच ऋतूमध्ये शेळ्या-मेंढ्यांसह स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी फिरत असतात. त्यामुळे या बांधवांना राज्यात कुठेही फिरण्यास मुभा मिळवण्यासाठी  प्रयत्न करण्याचे आश्वासन कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहे.
 

'दरवर्षी मेंढपाळांची शेकडो कुटुंबे कर्नाटक-महाराष्ट्रात शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी ये-जा करतात. पण यावर्षी कोरोनामुळे आंतरराज्य बंदी असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.'
-अण्णाप्पा ढवणे, मेंढपाळ, बेनाडी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com