महिलांना लिहतं करणारे व्यक्तीमत्व हरपले 

महिलांना लिहतं करणारे व्यक्तीमत्व हरपले 

कोल्हापूर : महिला, युवती, कुमारी यांच्याविषयी सद्‌भावना व्यक्त करणाऱ्या व त्यांना लिहित, बोलतं करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांना समाजाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी चळवळीत भुमिका बजावलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या म्हणून विद्या बाळ यांचे कार्य सदैव स्मरणात राहील व महिला सक्षमीकरण कार्यालाही बळ देईल, असा सुर समाजातील विविध क्षेत्रातील महिलांनी विद्या बाळ यांना श्रद्धांजली देताना व्यक्त केला. 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे पुण्यात निधन झाले. हे कळताच स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, पक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून विद्या बाळ यांच्या निधनाबद्दल दुखः व्यक्त करण्यात आले. सामाजिक चळवळीच्या निमित्ताने विद्या बाळ अनेकदा कोल्हापूरात आल्या. शैक्षणिक, सामाजिक व महिला सक्षमीकरण चळवळ या विषयी त्यांची कोल्हापूरला भेट होत असे. त्यानिमित्ताने त्यांचा संपर्क येथील विविध क्षेत्रातील घटकांशी होता. 

सीमा पाटील, प्रधान सचिव, अंनिस ः विद्याताई गेल्या आणि पुन्हा सावित्री हरपल्याच दुखः झालं. विद्याताई प्रचंड संयमी, शांत तितक्‍याच विवेकी पण तरीही कणखर असलेल्या स्त्री पुरूष समता विषयाच्या पुरस्कर्त्या होत्या. पुरोगामी विचारांच्या माय माऊली आमच्यातून निघुन गेल्या आणि आम्ही साऱ्या जणी पोरक्‍या झालो. त्यांचा लढा, त्यांचे विचार व त्यांची समाजाविषयीची तळमळ आम्ही खाली पडू देणार नाही. ती ताकदीने पुढे नेऊ. 

सुरेश शिपुरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ः विद्या बाळ यांचा सातत्याने सामाजिक प्रश्‍न विशेषतः महिलांच्या प्रश्‍नांसदर्भात कोल्हापूरशी संपर्क होता. आम्ही साऱ्या जणींच्या माध्यमातून महिलांना उभारी देणारे व मार्गदर्शनपर कार्य करत होत्या. महाराष्ट्रभर फिरून त्या महिलांना सजगही करत होत्या. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. 

प्रा. मेधा पानसरे, सामाजिक कार्यकर्त्या ः महाराष्ट्रातील स्त्री चळवळीतील एक अतिशय संवेदनशील, खंबीर व वैचारिकदृष्ट्या स्पष्ट व्यक्तीमत्व हरपले. अनेक पिढ्यातील स्त्री पुरूष विषमता, स्त्रियांचे प्रश्‍न, धर्म रूढी पंरपरा यातून स्त्रियांचे शोषण तसेच आत्मभान व आत्मसन्मान यासाठी त्यांच्या कार्याचे महत्व कायम राहिल. स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी प्रबोधन व आंदोलन अशा दोन्ही स्तरावर लढा दिला. आमच्या सारख्या स्त्री कार्यकर्त्यां त्यांच्या नेहमी ऋणात राहतील. 
सोनाली नवांगुळ, लेखिका ः स्त्रीचं जगणं सुंदर व सबळ करण्यासाठी विद्याताई ठामपणे बोलायच्या. जसे त्यांनी सुंदर जगण्याची संकल्पना मांडली तसेच त्यांनी इच्छामृत्यूचाही मुद्दा स्पष्टपणे मांडला. इच्छा मृत्यूसाठी कायदा परवानगी देत नाही. मात्र इच्छापत्रातून सुंदर मृत्यूची संकल्पना त्यांनी मांडली. या चळवळीत त्या नेहमी आघाडीवर राहिल्या. 

उज्ज्वला हिरकुडे, मिळून साऱ्याजणी मासिकाच्या प्रतिनिधी ः मिळून साऱ्याजणी या मासिकातून महिलांना आत्मसन्मान, आत्मभान व प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी केले. "ती आणि तो यांच्यापलीकडचे सर्व "ते', त्यांचा स्वतःशी व परस्परांशी संवाद' या ब्रिदवाक्‍यातून त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटत राहिल्या. अशा या प्रेरणादायी व्यक्तीमत्वाच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com