महाराष्ट्राचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Maharashtra enter semi-final In Football Kolhapur Marathi News
Maharashtra enter semi-final In Football Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल स्पर्धेत एका संघाच्या दोन सामन्या दरम्यान किमान 24 ते 48 तास अंतर असावे लागते. परंतु, अगरतला (त्रिपुरा) येथे सुरू असलेल्या 17 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत संयोजकांनी या नियमाचाच बोजवारा उडविला. महाराष्ट्राच्या संघाचे तब्बल तीन सामने एका दिवशी विविध मैदानावर झाले. तरीही, महाराष्ट्राने जिगरबाज खेळी करत दोन सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठून "हम भी कुछ कम नही' हे सिद्ध केले. 

अगरतला येथील 65 वी राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धा खेळापेक्षाही संयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे खेळाडूंसह पंच आणि तांत्रिक समितीच्या सदस्यांच्या टीकेचा विषय बनली आहे. महाराष्ट्राला, तर गुरुवारी (ता. 30) तब्बल तीन सामने एकाच दिवशी खेळावे लागले. सकाळी सात, दुपारी बारा आणि तीन वाजता हे सामने झाले. दुपारच्या सत्रात, तर दोन सामन्यात केवळ तासाभराचीच विश्रांती मिळाली. परिणामी, पहिलाच दिवस खेळाडू, प्रशिक्षकांचा कस पाहणारा ठरला. 

स्पर्धेत एकूण 40 राज्यांचे संघ असून त्यांची प्रत्येकी पाच याप्रमाणे आठ गटात विभागणी करण्यात आली. महाराष्ट्राने पहिल्याच सामन्यात मातब्बर मणिपूरला झुंजार खेळ करून 2-2 असे बरोबरीत रोखले. यात महाराष्ट्राच्या खुर्शीद अली आणि रोहित देसाईने महत्त्वपूर्ण गोल केले. तुल्यबळ हरियाणाला 3-1 असे नमविले. यश गंगवालने दोन, तर करण मेढेने एक गोल केला. फारुख रजाच्या निर्णयाक गोलच्या जोरावर छत्तीसगडचा तिसऱ्या सामन्यात पराजय केला.

दुबळ्या पांडिचेरीचा 8-0 असा धुववा उडवुन दिमाखात उपांत्य फेरी गाठली. मुस्तफा शेखचे विक्रमी चार, तर यश गंगवाल, संकेत मेढे, सिद्धकी यांनी प्रत्येकी एक गोल केला. रोहित देसाई, गोलरक्षक दर्शन उपरलवार यांनी उत्कृष्ट खेळ केला. उद्या (ता.1) सकाळी सात वाजता दिल्ली विरुद्ध उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार आहे. 

रीतसर तक्रार
स्पर्धेचे वेळापत्रक पाच दिवसांचे असतानाही तीन दिवसात स्पर्धा गुंडाळली जात आहे. एकाच दिवशी अधिक सामने खेळावे लागल्याने खेळाडूंना अधिक दुखापती झाल्या. याबाबत रीतसर तक्रार केली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून खेळाडूंनी मात्र झुंजार कामगिरी केली. 
- धीरज मिश्रा, प्रशिक्षक, महाराष्ट्र 

नाष्ट्याला शिळे अन्न 
तीन सामने असल्याने खेळाडूंना विश्रांती, तर सोडाच अंघोळ, नाष्टा आणि जेवणालाही पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यातच नाश्‍ता सकाळी लवकर लागणार म्हणून संयोजकांनी रात्रीच करून ठेवलेले शिळे अन्न खेळाडूंना दिले. स्पर्धेसाठी असणारी तीन मैदाने 40 किलोमीटर परिसरात असल्याने दुसऱ्या सामन्यानंतर लांबच्या प्रवासाचा वैतागही सहन करावा लागला. याबाबतची संपूर्ण तक्रार तांत्रिक समितीच्या प्रमुखांनीच दिली आहे, असे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com