मंडळाच्या गणेश मूर्ती गडहिंग्लजहून बेळगावला रवाना, रंगकामासाठी जागू लागल्या रात्री

दीपक कुपन्नावर | Wednesday, 5 August 2020

कुंभारवाड्यात 50 कुटुंबीयांतर्फे पाच हजार मूर्ती तयार केल्या जातात. लॉकडाउनमुळे अर्थचक्र विस्कळित झाले आहे. याचा सर्वांनाच फटका बसला. परिणामी, दरवर्षी जूनपर्यंत पूर्ण होणारी नोंदणी अद्याप सुरू आहे.

गडहिंग्लज : केवळ 20 दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी कुंभारवाड्यात लगबग वाढली आहे. रंगकामासाठी संपूर्ण कुटुंबच रात्री जागवू लागले आहे. वातावरणातील गारठ्यामुळे मूर्ती वाळवण्यासाठी मूर्तिकारांना कसरत करावी लागते. येथील कलाकारांनी तयार केलेल्या मंडळाच्या मोठ्या गणेशमूर्ती बेळगावला रवाना झाल्या. घरगुती मूर्ती शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. 

येथे कुंभारवाड्यात 50 कुटुंबीयांतर्फे पाच हजार मूर्ती तयार केल्या जातात. लॉकडाउनमुळे अर्थचक्र विस्कळित झाले आहे. याचा सर्वांनाच फटका बसला. परिणामी, दरवर्षी जूनपर्यंत पूर्ण होणारी नोंदणी अद्याप सुरू आहे. त्यामुळे मूर्ती करायच्या तर किती असाच प्रश्‍न मूर्तिकारांसमोर होता. त्यातच कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

दोन महिन्यांपासून गणेशमूर्तीकामाला गती आली. गेल्या महिन्यात शासनाने मंडळाच्या गणेशमूर्ती चार फुटांपर्यंत ठेवण्याच्या सूचना केल्या. बहुतांश मूर्ती तयार झाल्यावर हे आदेश आल्याने मूर्तिकारांची कोंडी झाली. मुळातच कोरोनाच्या बिकट परिस्थितीत ऐनवेळी हा निर्णय झाल्याने तयार झालेल्या मूर्ती लगतच्या कर्नाटकात खपविण्यासाठी पळापळ करावी लागली. दरवर्षीच्या तुलनेत केवळ पाच टक्के गणेशोत्सव मंडळांनी मूर्तीसाठी नोंदणी केल्याचे मूर्तिकार किरण जोतिबा कुंभार यांनी सांगितले. 

पंधरा दिवसांपासून मूर्ती रंगकामाला सुरवात झाली. महिलाही घरातील भोजनासह अन्य जबाबदाऱ्या सांभाळत मूर्ती रंगकामासह पडेल ती मदत करण्यात आघाडीवर आहेत. पाऊस असल्याने हवेत गारठा आहे. त्याचा मूर्ती आणि रंग वाळण्यात अडथळा येतो. यासाठी ड्रायरचा वापर करावा लागतो. नव्या पिढीच्या कलाकारांनी पारंपरिक कृत्रिम रंग सोडून नैसर्गिक रंगावर भर देत वेगळी वाट धरण्याचा प्रयत्न केला आहे. रंगकामासाठी शहरातील हौशी कलाकारही कुंभारवाड्यात हजेरी लावत आहेत. 

गणेशमूर्ती सियाचीनला... 
दरवर्षी येथील गणेशमूर्तींना स्थानिक परिसरासह लगतच्या कर्नाटकातून मागणी असते. यंदा सियाचीन येथे गणेशमूर्ती पाठवली जात आहे. काश्‍मीरमध्ये अनेक लष्करी केंद्रांवर मराठी सैनिकांची संख्या अधिक आहे. त्याठिकाणी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. येथील सैनिक रावसाहेब पाटील हे मूर्ती सियाचीनला घेऊन जात आहेत. मूर्तिकार सुनील कुंभार यांनी ही मूर्ती तयार केली आहे. 
 

 

संपादन - सचिन चराटी