मराठा समाजाच्यावतीने चक्का जाम ; कोल्हापूर-गारगोटी वाहतूक दोन तास ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

सकाळी दहा वाजता आंदोलक बसस्थानक परिसरात एकत्र आले. यानंतर आंदोलकांनी गारगोटी-कोल्हापूर मार्गावर ठिय्या मारला.

गारगोटी : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात असंतोष आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते भुदरगड तालुक्‍यात विविध आंदोलन करीत आहे. भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येथे चक्का जाम आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी गारगोटी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास रोखून धरली. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. 

भुदरगड तालुका सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. सकाळी दहा वाजता आंदोलक बसस्थानक परिसरात एकत्र आले. यानंतर आंदोलकांनी गारगोटी-कोल्हापूर मार्गावर ठिय्या मारला. रस्ता अडविल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. यावेळी मराठा समाजाच्या आंदोलकाकडून एक मराठा-लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी जोरदार घोषणाबाजी केली. आनंद चव्हाण, सचिन भांदिगरे, मच्छिंद्र मुगडे, किरण आबिटकर, डॉ. राजीव चव्हाण यांची भाषणे झाली. तहसीलदार अमोल कदम यांच्याकडे किरण आबिटकर हिने निवेदन सादर केले. 
मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे, राहुल देसाई, प्रा. अर्जुन आबिटकर, विश्वनाथ कुंभार, सत्यजित जाधव, सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच सौ. स्नेहल कोटकर, प्रवीणसिंह सावंत, यशवंत नांदेकर, किशोर आबिटकर, शिवसेनेचे प्रकाश पाटील, अरुण शिंदे, अविनाश शिंदे, दीपक देसाई, संग्राम सावंत, तानाजी देसाई, शरद मोरे, विश्वजित जाधव, संदीपराज देसाई आदी उपस्थित होते. 

हे पण वाचा -  ह्रदयद्रावक! आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दाम्पत्याचा शेवटही सोबतच

 

मागण्या अशा 
- आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत नोकरभरती नको 
- कायमस्वरूपी आणि टिकाऊ आरक्षणासाठी शासनाने प्रयत्न करावेत 
- सारथी संस्थेसाठी एक हजार कोटींचा निधी द्यावा 

हे पण वाचा - Kolhapur CPR Fire Update : मेन स्विच बंद केला नसता तर... 

  
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha community protest in kolhapur gargoti