कोल्हापूर : प्रयाग चिखलीला बेटाचे स्वरुप; संसार उपयोगी साहित्यासह ग्रामस्थ सुरक्षित स्थळी

Migration of kolhapur prayag chikhali people
Migration of kolhapur prayag chikhali people

कोल्हापूर - गेल्या तीन दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे पंचगंगेला आलेल्या पुराचे पाणी गावांमध्ये शिरल्यामुळे प्रयाग चिखली येथील बहुतांशी (80 टक्के) ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी संसार साहित्य आणि जनावरांसह स्थलांतर केले. गतवर्षीच्या महापुराचा तडाखा बसलेल्या चिखली ग्रामस्थांनी पुराचा कोणताही धोका होऊ नये. म्हणून बुधवारपासूनच स्थलांतरास सुरुवात केली होती. 

जिल्हा प्रशासनाने स्थलांतराबाबत केलेल्या आव्हानाला बुधवारी ग्रामस्थांकडून अल्प प्रतिसाद मिळाला मात्र बुधवारी सायंकाळी पुराचे पाणी प्रचंड वाढू लागल्याने ग्रामस्थांनी रात्रभर पाण्याचा अंदाज घेत आपले सर्व संसार साहित्य आणि जनावरे गुरुवारी सकाळपासून स्थलांतर करण्याच्या दृष्टीने सज्ज ठेवले होते.

दरम्यान, पाणी अधिकच वाढू लागल्याने अनेक ग्रामस्थ मध्यरात्रीच स्थलांतरित झाले. अनेकांनी सकाळ होण्याचीची वाट बघत रात्र जागून काढली. अनेकांनी पहाटेच्या संधीप्रकाशातच आपल्या घरांना कुलपे लावून स्थलांतर करण्यास सुरुवात केली. पुराचे पाणी घरात येण्याची शक्यता गृहीत धरून ग्रामस्थांनी रात्रभर आपले संसार साहित्य वरच्या माळ्यावर सुरक्षित ठेवून गरजे एवढे साहित्य आणि जनावरे, वैरण आणि सिद्धा घेत मिळेल त्या वाहनाने सोनतळी, कोल्हापूरसह आसपासच्या गावांमध्ये पूर्वनियोजित स्थलांतर ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावर गर्दी केली होती. 

सकाळी सात वाजता चिखलीच्या मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी नव्हते. मात्र अवघ्या दोन तासात म्हणजे सकाळी नऊ वाजेपर्यंत चिखलीच्या मुख्य रस्त्यावर एक फुटावर पाणी वाढले. त्यामुळे ग्रामस्थांची धावपळ आणखीनच वाढली. दुपारी बारा वाजेपर्यंत गावातील सुमारे 80 टक्के ग्रामस्थ उस्फूर्तपणे स्थलांतरित झाल्याने प्रशासनावरचा ताण कमी झाला. बघता-बघता प्रयाग चिखली गावाच्या मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले. गुरुवार दिवसभरात पावसाचा जोर थोडा कमी राहिल्याने पाणी वाढण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे गावातील उर्वरित ग्रामस्थांना थोडासा दिलासा मिळाला. तरीही सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनेक ग्रामस्थ या पुराच्या पाण्यातून वाट काढत स्थलांतर करत असल्याचे चित्र दिसत होते. चिखली बरोबरच आंबेवाडी गावातीलही अनेक कुटुंबांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. दोन दिवसापासून स्थलांतराच्या निमित्ताने चिखली आंबेवाडी ग्रामस्थांची प्रचंड धावपळ व प्रचंड हाल झाले. भाड्याचे वाहन घेऊन त्यामध्ये संसार साहित्य आणि जनावरे , वैरण घेऊन सुरक्षेच्यादृष्टीने लोकांची धावपळ उडाली. 

 चिखली ग्रामस्थांनी चालू वर्षी पूर आला तर सोय असावी म्हणून एप्रिल व मे महिन्यांमध्येच पावसाळ्यातील पुराच्या काळातील वास्तव्याचे नियोजन केले होते. चिखली गावातील 1429 कुटुंबांपैकी फक्त 116 कुटुंबांनी तर आंबे वाडीच्या पन्नास कुटुंबांनी शासनाच्या मदतीची अपेक्षा केली होती. प्रशासनाने कोल्हापुरातील शहाजी कॉलेज, महावीर कॉलेज, बुधवार पेठ, राजर्षी शाहू विद्यालय याठिकाणी स्थलांतराचे नियोजन केले होते. त्याचा फायदा स्थलांतरित ग्रामस्थांना झाला.


दरम्यान, स्थलांतराच्या दृष्टीने प्रयाग चिखलीतून विविध वाहनांमधून लोक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने चिखली- आंबेवाडी आणि कोल्हापूर- पन्हाळा मार्ग दिवसभर वाहनांच्या गर्दीने फुलून गेला होता. 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com