गोव्यासह आठ जिल्ह्यात 5 ते 25 मार्चदरम्यान सैन्यभरती 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

मार्चमध्ये होणाऱ्या भरतीसाठी नोंदणी झालेल्या परंतु, प्रवेश पत्र मिळालल्या उमेदवारांनाच भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि गोव्यातील उत्तर आणि दक्षिण अशा 8 जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची सैन्यभरती 5 ते 25 मार्चदरम्यान होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर होणारी भरती सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज बैठकीत दिली. 

निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, कर्नल विक्रमादित्यासिंह पाल, प्रांताधिकारी वैभव नावाडकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल प्रदीप ढोले उपस्थित होते. 

कर्नल श्री. पाल यांनी यावेळी माहिती दिली. मार्चमध्ये होणाऱ्या भरतीसाठी नोंदणी झालेल्या परंतु, प्रवेश पत्र मिळालल्या उमेदवारांनाच भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार असल्याने त्याबाबत भरती प्रक्रियेचे नियोजन करावे लागणार आहे. 
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ""महापालिकेने उमेदवारांना भरतीच्या ठिकाणी जाण्यासाठी के.एम.टी.बसच्या फेऱ्या सुरु ठेवाव्यात, आरोग्य विभागाने आवश्‍यक मनुष्यबळासह पथके नियुक्त करावीत. रुग्णावाहिका, फिरते शौचालये, आवश्‍यक पोलिस बंदोबस्त, ब्रॉडबॅंड सुविधा, फर्निचर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत दिव्यांची सोय याबाबत संबंधित विभागाने नियोजन करावे.'' 

हे पण वाचा - ब्रेकिंग- दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी पसार ; हत्यारे जप्त

 

बैठकीला शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एन. देवकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अविनाश पोळ आदी उपस्थित होते. 
 
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Military recruitment from March 5 to 25 in eight districts including Goa